रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

''गारठा नाही ना वाटत तुम्हाला?''

''छे ! मला आत खूप ऊब आहे. मी नेहमी भरपूर कपडे घालतो. जाड जाड ऊबदार कपडे. थंडी असो वा नसो. अंगात ते कपडे पाहिजेत. तुम्हाल हुडहुडी भरली असेल?'' आनंदमूर्तींनी विचारले.

''तुमचे हात माझ्या छातीशी आहेत. त्यामुळे तेथे ऊब आहे. हृदयाला जपलं म्हणजे झालं.''

''हो, हृदय हवं आधी. हृदय असेल तर सारं आहे.''

''माझं हृदय जर तुम्ही आपल्या हातात घेतलं आहे.''

''तुम्ही आपलं हृदय सर्वांना देता. सर्व कृतीत ओतता. तुम्ही उंदारांचे राणे आहात.''

''दौडवा ना घोडा. धनगाव अद्याप दूर आहे.''

''धन दूरच असतं. जवळ असलं तरी दूर वाटतं.''

''केव्हा चोर येईल, केव्हा मरण येईल असं धनवंताला वाटतं.''

''आता पिटाळतो घोडा; सावध राहा.'' असे म्हणून आनंदमूर्तींनी घोडयाला दौडविले. वार्‍यासारखा तो वारू निघाला. जणू पाण्याचा लोंढाच जोराने चालला होता. जणू बिजली होती.

''पडेन, पडेन मी. घट्ट धरा.'' मुकुंदराव घाबरून म्हणाले.

''पडलो तर एकदम पडू. परंतु मी पडू देणार नाही. त्या चढणीवर आता चढू.'' आनंदमूर्ती धीर देत म्हणाले.

दुरून धनगावचे दिवे दिसू लागले.

''ते पाहा धनगाव. दिसला प्रकाश.'' मुकुंदराव म्हणाले.

''तुम्ही आता कोठे जाणार रात्री?''

''आपण मोहनच्या खोलीकडे आधी जाऊ. त्याला सारी हकीगत विचारू.'' मुकुंदराव म्हणाले.

क्रांती