गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

''भयंकर आरोप आहेत. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट; बाँब, पिस्तुलं जमविण्याचा कट. मी तरी काय करू? एखाद्या मुलीचं सौभाग्य वाचवण्याचं पुण्य लाभत असेल तर ते का मी गमावीन?'' साहेब म्हणाले.

''परंतु तो तरुण तसा नव्हता.'' रमेशबाबू म्हणाले.

''काय नेम सांगावा?'' साहेब उत्तरले.

''तो खादीचा भक्त आहे. चरख्यावर सूत काततो. त्याच्या घराशेजारीच सुंदर आश्रम आहे. त्या आश्रमाला त्याचीच मदत असते. असा तरुण हिंसेकडे कसा वळेल?'' रमेशबाबूंनी विचारले.

''अहो, शंका येऊ नये म्हणून हे खादीचं सोंग करावयाचं. हे पाहा, भरपूर पुरावा आहे माझ्याजवळ. बंगालमधील दहशतवाद्यांकडून त्यांना गेलेली पत्रं माझ्याजवळ आहेत. तुम्हाला दाखविली तर तुम्हीसुध्दा निःशंक व्हाल.'' अधिकारी म्हणाले.

''परंतु त्याचे उत्तर इकडे कोणाला आलेलं आहे का? पत्रं इंग्रजीत आहेत की बंगालीत?'' अक्षयबाबूंनी शंका काढली.

''अक्षयबाबू, तुम्ही माझे लहानपणीचे मित्र. सारं तुमच्यासमोर मांडतो.'' असे म्हणून आनंदमोहनांनी पुराव्याची ती पत्रे त्यांच्यासमोर ठेवली.

''माझ्याकडेच आहे हे काम. मलाच सर्व पुरावा पुरवायचा आहे. अद्याप पूर्ण तपास झाला नाही.'' ते म्हणाले.

दोघे मित्र ती पत्रं पाहू लागले. बंगालमधून गेलेली, बंगालकडे आलेली पत्रं त्यांनी सूक्ष्म रीतीनं पाहिली. त्यांतील हस्ताक्षर वगैरे पाहिलं. अक्षयकुमार एकदम उठून बाहेर गेले.

''आहेत ना पत्रं !'' आनंदमोहनांनी विचारले.

''परंतु येणार्‍या व जाणार्‍या पत्रांतील हस्ताक्षर एक दिसतं. तुम्ही नीट पाहा. काही तरी गोंधळ आहे.'' रमेशबाबू म्हणाले.

''अक्षयकुमार, कोठे आहात? अक्षयबाबू !'' त्यांनी हाक मारली. अक्षयबाबू आत आले. त्यांचा चेहरा गंभीर होता.

''तुम्हांला काय वाटतं?'' रमेशबाबूंनी विचारले.

''सांगा, मत सांगायला काय झालं? मला मदत होईल.'' साहेब म्हणाले.

''आनंदमोहन, ही सर्व पत्रं माझ्या मुलाची आहेत. प्रद्योतचं हे हस्ताक्षर. बिलकुल शंका नाही. प्रद्योतचं मायेवर प्रेम होतं. त्याचा हा सूड आहे. सारा उलगडा झाला. रामदास निर्दोष आहे. अपराधी माझा मुलगा आहे.'' अक्षयकुमार अतिदुःखाने बोलले.

''बरं, आधी जेवू चला पोटभर. रिकाम्या पोटी बुध्दी नीट चालणार नाही. चला, उठा.'' ते म्हणाले.

क्रांती