गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

धनगावच्या त्या टेकडीवर एक तरुण सायंकाळ संपून रात्र येऊ लागली तरी बसला होता. एकदम बंगाली गाणे तो गाऊ लागला, ''येतो, तुला मी भेटायला येतो. कोण तुला माझ्या जवळून हिरावून नेईल बघतो.'' अशा अर्थाचे ते गाणे होते. गाण्याच्या भरात आपल्याजवळ कोणी दुसरे येऊन उभे आहे याचे त्याला भानच नव्हते. गाणे संपल्यावर त्याने जवळ कोणी आहे असे पाहिले.

''घाबरू नका; मी बंगालमधलाच आहे. किती तरी दिवसांनी बंगाली गाणी ऐकायला मिळालं. इकडे कोठे आलात तुम्ही?'' त्या गृहस्थाने त्या तरुणास विचारले.

''मी एक स्वैरसंचार करणारा मुसाफिर आहे. माझ्या एका मित्राला येथे अटक झाली आहे. तो मित्र महाराष्ट्रीयन आहे. त्याची पत्नी बंगालमधील आहे. तिला धीर देण्यासाठी मी आलो आहे.'' तो तरुण म्हणाला.

''चांगलं केलंत.''

''मी आता जातो. ती एकटी खोलीत रडत बसली असेल.'' असे म्हणून तो तरुण उठला व टेकडीवरून पळतच खाली उतरला.

माया खोलीत एकटी होती. आनंदमूर्ती नुकतेच येऊन गेले होते. मुकुंदराव कामगारांच्या सभेला गेले होते. शांतेची मुलगी क्रांती जरा आजारी होती. नाही तर ती आली असती. आरामखुर्चीत माया डोळे मिटून पडली होती. कोणी तरी हळूच दार उघडून आत आले. ती व्यक्ती मायेच्या आरामखुर्चीच्या पाठीमागे उभी राहिली. माया निजली आहे की काय हे त्याने वाकून पाहिले. त्याचा कढत श्वासोच्छ्वास मायेला लागून ती एकदम दचकून डोळे उघडून पाहू लागली. तो कोण तेथे उभा?

''प्रद्योत, चोरासारखा येऊन काय करणार होतास?''

''मी चोर नाही. चोर हा महाराष्ट्रीय भामटा. माझं चोरलेलं रत्न. मी पुन्हा पकडणार होतो. माये, तू माझी आहेस. हे तुझे ओठ माझे आहेत. हा माझा अमृताचा पेला त्यानं पळविला.'' प्रद्योत पुढे सरकणार होता.

''खबरदार जवळ येशील तर ! प्रद्योत, लाज नाही वाटत परांगनेला स्पर्श करायला?'' ती क्रोधाने थरथरत म्हणाली.

''तू परांगना नाहीस. तू माझी आहेस. लहानपणापासून मी माझा शिक्का तुझ्यावर मारला आहे. तू रागानं पाहिलंस म्हणून मी जळणार नाही. पाषाणी, माझ्या सर्व आशांचं भस्म करावयास तुला काही वाटलं नाही? आणखी रागानं पाहा. प्रद्योत भाजला जाणार नाही. पाहा, या प्रद्योतकडे नीट पाहा. या प्रद्योतच्या जीवनाचं कसं मातेरं केलंस ते पाहा. माझे डोळे खोल गेले. माझे गाल बसले. मी भुतासारखा झालो. चांडाळणी, तुझं हे काम. तू माझं जीवन आज निस्सार केलं आहेस. प्रद्योत एक वेळ फेक बाजूला. दुसरे तरुण का बंगालमध्ये नव्हते? बंगाल का सारा ओस? बंगाल का निर्वीर्य झाला आहे? दगडधोंडयाच्या देशातील एका महाराष्ट्रीय माकडाला माळ घातलीस. लाज नाही वाटत तुला? वंगभूमीचा तू अपमान केला आहेस. वंगीय तरुण-तरुणींचाही तू अपमान केला आहेस. एक बंगालकन्या महाराष्ट्रीय माकडाल मिठया मारीत आहे हे आम्हाला बघवत नाही. प्राणांवर उदार होणारे बंगाली तरुण त्या तरुणांतील मी एक आहे. तुला महाराष्ट्रीय भुताशी विलासचेष्टा मी करू देणार नाही. तू पाप केलंस स्वजनद्रोहाचं पाप केलंस. तुझ्या हातून हे पाप पुढं होऊ नये म्हणून मी डाव रचला. त्याला अडकवलं. आता ते माकड पडेल बंदिशाळेत. माया, परत बंगालमध्ये चल; तू माझी हो. सुंदर सुंदर बंगाल, पावन पुण्यमय पराक्रमी बंगाल! रामकृष्ण-विवेकानंदांचा बंगाल; बंकीम व रवींद्र यांचा बंगाल; चल त्या विश्वभूषण वंगभूमीकडे परत चल. या प्रद्योतला शांत कर. मला मातृभूमीची सेवा करायला शिकव. या महाराष्ट्रात काय आहे? माती नि दगड. ना काव्य ना शास्त्र; ना कला ना सौंदर्य, ना पराक्रम ना त्याग; ना स्वाभिमान ना ज्ञान. वंगभूमीतील माणिकमोती सोडून मातीला मानलेस. वेडी, चल हे पाप पुरे. हा प्रद्योत तुला अतःपर हे पाप करू देणार नाही.'' प्रद्योत थांबला.

क्रांती