बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

२५. कामगारांचा संप

शेवटी धनगावला पगारवाढीचा लढा सुरू होणार असे दिसू लागले. मालकांना भरपूर फायदा होत होता. तरीही पूर्वी एकदा मंदीच्या काळात जी पगारकाट झाली ती कायमची मानगुटीस बसली होती. कामगार कार्यकर्त्यांनी आकडे देऊन सिध्द केले. परंतु मालक अडेलतट्टू. ते काही विचार करावयास तयार नव्हते. कामगारांचा संप टिकणार नाही अशी त्यांना खात्री होती. मालकाचे हस्तक खेडयापाडयांतून नवीन मजूर मिळावेत म्हणून हिंडूफिरू लागले होते.  त्यांचीही लढा देण्याची तयारी होती. एकमेकांना आपापली शक्ती अजमावण्याची इच्छा होती. कामगारांच्या सभा, मिरवणुका चालू होत्या. ''पगारवाढ ताबडतोब'' हा शब्द सर्वत्र दुमदुमून राहिला होता. शाळेत जाणारी लहान मुले वाटेत जाताना ''पगारवाढ ताबडतोब'' असे म्हणत जात. झोपेतसुध्दा मुले ती वाक्य उच्चारीत. वातावरण गरम झालेले होते.

नवरात्राचा त्या दिवशी आरंभ होता. वास्तविक किसान कामगारचळवळीत धार्मिक रूढींना महत्त्व नाही. कामगार हिंदूही आहेत; मुसलमानही आहेत. सर्व धर्मांचे आहेत. त्यांच्या लढयाचा नवरात्राशी काय संबंध? नवरात्राचा संबंधच आणावयाचा असला तर एका साम्राज्यसत्तेविरुध्द जनतेची शक्ती त्या दिवशी प्राचीन काळी उठली होती. महिषासुराला दूर करावयास दरिद्री जनता उठली होती. महिषासुर म्हणजे कोण? महिष म्हणजे रेडा. तो फार श्रम करीत नाही. फुकट खातो व माजतो आणि शेवटी सर्वांन शिंग मारतो. महिष म्हणजे साम्राज्यशाही, भांडवलशाही. गरिबांच्या श्रमावर पुष्ट होऊन गरिबांना धुळीत ठेवणार्‍या सार्‍या संस्था म्हणजे महिषासुराचे अवतार.

धनगावचे कामगार तेथील महिषासुराला मऊ करण्यासाठी, त्याला वेसण घालण्यासाठी, त्याला शरण आणण्यासाठी, नवरात्राच्या दिवशी उभे राहिले. तेथील कामगार-चळवळीतील तो नवदिवस होता. ती नवरात्र होती. आदल्या दिवशी आठ हजार कामगारांनी मशालींची प्रचंड मिरवणूक काढली. आठ हजार कामगारांच्या घरची हजारो मंडळी त्यात सामील झाली. धगगावचे शेकडो विद्यार्थी त्यात येऊन मिळाले. आसपासच्या दशक्रोशीतील हजारो किसान ती पेटती व पेटविणारी मिरवणूक पाहायला आले. 'इन्किलाबची' गगनभेदी गर्जना होती. 'भविष्य राज्य तुम्हारा मानो' हे चरण म्हणताना कामगार उंच होत होता. जणू भविष्यातील राज्य वर्तमानात आणण्यासाठी उंच होत होता. त्या पेटत्या मशाली, त्या ज्वाला म्हणजे कामगारांचे धडपडणारे आत्मे होते. आम्हाला शांत करा. नाही तर त्रिभुवन भस्म करू, असे जणू त्या जळजळीतपणे सांगत होत्या. किसान व कामगार यांच्या पोटात आग भडकली आहे. ती आग आता बाहेर पडणार. सावधान ! सावधान ! असे जणू ती मशालींची मिरवणूक जगजाहीर करीत होती. अग्नीला साधी आहुती द्यावी असे भारतीय संस्कृती सांगते, अग्निहोत्र पाळायला सांगते, हे कोठे आहे अग्निहोत्र? हा कोठे आहे पवित्र अग्नी? प्रामाणिक श्रम करून ज्याच्या पोटात आग भडकली आहे, ती आग शांत करणे म्हणजे अग्निहोत्र पाळणे, म्हणजेच अग्नीला आहुती देणे. श्रमजीवी जनतेचा अग्नी- त्याला आधी आहुती द्या. मग उरेल ते तुम्ही खा. आधी त्यांचा हक्क. आधी त्यांची झीज भरून काढा. हा यज्ञ केल्यावर, ही आहुती दिल्यावर, जे यज्ञशिष्ट उरेल ते खा; म्हणजे ब्रह्मप्राप्ती होईल. परंतु किसान कामगारांची तृप्ती करण्याच्या आधी जे स्वतःचीच सदैव चैन बघतात, त्यांना श्रीकृष्णाची गीता 'पापात्मा' म्हणते.

या पापात्म्यांना सावध करण्यासाठी ती मिरवणूक होती. सारे शहर त्या मिरवणुकीने हादरले, जागृत झाले. सर्वांची सहानुभूती त्या उपाशी कामगारांकडे वळली. दुसर्‍या दिवसापासून संप सुरू झाला. अत्यंत व्यवस्थित संप. उजाडले नाही तोच हजारो कामगार मैदानावर जमत. तेथून लाल व तिरंगी झेंडे घेऊन गावात मिरवणूक काढीत व आपापल्या मिलला गराडा देऊन बसत. आपल्या स्वार्थाला जरा मर्यादा घाला असे जणू ते सांगत. नवीन कामगार कोठूनही आत जाणार नाही अशी दक्षता बाळगीत. मिलच्या दरवाज्यातून शूर कामगार भगिनी बसत. १९१७ मध्ये रशियात मास्को येथे स्त्रीकामगारांनी क्रांतीचे निशाण रोवले. भारतीय भगिनीही आज उभ्या राहिलेल्या होत्या.

क्रांती