बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

मोहन तेथेच पडलेला होता. मुकुंदराव, श्यामराव व अहमद मोहन अजून का येत नाही म्हणून पाहावयास आले. ता तेथे मोहन पडलेला. येथे कसा मोहन पडला? मुकुंदराव वर गेले.

''युनियनचा चिटणीस येथे पडला आहे तर तुम्ही येथे बसलेले?'' ते शांतपणे म्हणाले.

''आम्हाला काय करावयाचं आहे? पडला असेल. आम्हाला काय माहीत? युनियन करील व्यवस्था !'' डायरेक्टर म्हणाले.

मुकुंदराव शांतपणे परत फिरले. तो एक लहान मुलगा तेथे आला व म्हणाला, ''या नोकरांनी ढकललं यांना. ते कचेरीतील कोणी म्हणाले, 'द्या कुत्र्याला ढकलून,' त्यांनी ओढीत आणून ढकललं.''

अहमद गेला व गाडी घेऊन आला. मोहनला दवाखान्यात नेण्यात आले. त्याला एका खाटेवर ठेवण्यात आले. त्याची शुश्रूषा सुरू झाली. मोहनला ढकलून दिल्याची वार्ता विजेप्रमाणे पसरली. त्याला 'कुत्रा' म्हटल्याने हजारो कामगारांना चीड आली. वातावरण गंभीर झाले. परंतु कामगारांचा राग गिरण्यांवर होऊ नये म्हणून एकदम 'कामगार मैदानावर सभा, कामगार मैदानावर सभा' अशी कर्ण्यांतून दवंडी सर्वत्र देण्यात आली. सारे कामगार जमले. मुकुंदरावांनी सर्वांना शांत करणारे भाषण केले. ते म्हणाले,''आपण चिडून जाता कामा नये. चिडलो तर सारं बिघडेल. मोहनला त्यांनी ढकललं. तंनी मोहनला नाही ढकललं तर स्वतःच भांडवलशाहीला ढकललं आहे. कामगाराला ढकलाल तर कशावर जगाल? शूर कामगारांना सर्व देशात अशा प्रसंगांतून जावं लागलं. आपणांतील अनेकांना मरावं लागेल. क्रांती आपल्या बलिदानातून येईल. मोहनच्या अपमानाचा बदला घेणं म्हणजे मिलवर दगड फेकणं नव्हे. एक दिवस सत्ता आपल्या हाती घेऊ तेव्हाच खरा बदला घेतला असं ठरेल. आपला व्यक्तीशी झगडा नाही. एका जुलमी अन्याय्य समाजरचनेशी झगडा आहे. जोपर्यंत आपण शांत आहोत तोपर्यंत आपला जय आहे. सरकारची लाठी व बंदूक वाट पाहात आहे. वाट पाहतच बसू दे. आपण लाठीला व बंदुकीला भितो असा याचा अर्थ नव्हे. शांतपणे प्रतिकार करीत असता खुशाल लाठया येवोत. गोळया येवोत. शूराप्रमाणे ते घाव छातीवर झेलू. कामगारांचा प्रत्येक घाव हा भांडवलशाहीचा घाव आहे. भांडवलशाहीचेच त्यानं तुकडे-तुकडे होतील. मोहन मरणशय्येवरून तुम्हाला शांत रहा असं सांगत आहे. मोहनच्या आत्म्याला क्लेश होतील असं काही करू नका. भांडवलशाहीनं मोहनचा देह लाथाडला. परंतु तुम्ही जर अत्याचार कराल तर मोहनचा आत्मा लाथाडलात असं होईल. भांडवलशाहीनं मोहनच्या शरीराचा बळी घेतलात असं होईल. परवा ती भगिनी मॅनेजरवर थुंकली. मी तिची मनःप्रवृत्ती समजू शकतो. परंतु अशानं लाल झेंडयाला कमीपणा येतो. लाल झेंडा अशा थुंका नाही टाकणार. लाल झेंडा एका थोर ध्येयासाठी उभा आहे. मालकशाहीचे अन्याय पाहिले म्हणजे तुम्ही कितीही अत्याचार केलेत तरी ते एका दृष्टीनं क्षम्य असे म्हणता येतील. परंतु आपल्याला निराळया त-हेनं  लढावयाचं आहे. आपला झेंडा अधिकच उज्ज्वल करावयाचा आहे.  मालकांचा अत्याचारी झेंडा; आपलाही का त्याच दर्जांचा करावयाचा? आपला झेंडा आपण आपल्या रक्तानं रंगवू, दुसर्‍याच्या नाही. ही खरी क्रांती होईल, ती टिकेल.''

कामगारांच्या भावना जरा शांत झाल्या. काही दंगाधोपा झाला नाही. असे दिवस चालले. कामगारांना मदतीची फार जरूरी होती. हिंदुस्थानातील ठिकठिकाणच्या कामगार संघटनांकडून सहानुभूतीचे संदेश व थोडीफार मदत आली; परंतु ती कितीशी पुरणार? उपाशीपोटी दसर्‍यासारखा सण गेला. कोजागिरी गेली. कामगार प्रक्षुब्ध होऊ लागले. पानपताच्या लढाईच्या वेळेस मदत आली; परंतु ती कितीशी पुरणार?'' आम्हाला उपाशी का मारता?'' उपाशी मारण्याऐवजी शत्रूवर हल्ला करून काय तो सोक्षमोक्ष लावून द्या.'' कामगार अशीच भाषा बोलू लागले. सरकार व मालक शांत होते. बोलणे-चालणे सारे बंद. दिवाळी जवळ येत होती. कामगारांच्या घरी शिमगा होता. तेथे बोंबाबोंब होती. होळी पेटली होती. मुकुंदरावांना चिंता वाटू लागली. पोराबाळांची उपासमार किती दिवस पाहणार?

क्रांती