रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

''तुम्ही आज फार गंभीर दिसत आहात?'' आनंदमूर्तींनी विचारले.

''मग का हसू, खेळू? कामगारांच्या सहनशीलतेचा शेवटचा तंतू तुटण्याची वेळ येत आहे. काय करावं? दिवाळी जवळ येत आहे. पोरंबाळं उपाशी !'' मुकुंदराव म्हणाले.

''मी मदत आणू का कोठून?'' त्यांनी विचारले.

''कोठून आणणार तुम्ही?''

''आणीन कोठून तरी. येऊ जाऊन?''

''लवकर या. परिस्थिती बिकट होत चालली आहे. रामदासही तुरुंगात. मोहन मरणशय्येवर. शांतेची मुलगीही आजारी आहे. लोकांना शांत राखलं पाहिजे. तुमची प्रसन्न व प्रेमळ मुद्रा पाहून लोक शांत राहतात. मदत घेऊन ओलावा घेऊन लवकर या.'' मुकुंदराव म्हणाले.

चार दिवशी दिवाळी होती. परंतु गावात कोणाला काही सुचत नव्हते. सारे हवालदिल होते. आठ हजार कामगार व त्यांच्या घरची मंडळी-वीस हजार माणसे शहरात उपाशी असणे हा सर्वांना धोका होता. केव्हा लूट होईल, केव्हा भुकेचा वणवा भडकेल, नेम नव्हता. सर्वांनी प्राण जणू मुठीत ठेवले होते. त्या दिवशी प्रचंड सभा भरली. उत्साह कायम ठेवण्यासाठी सभा-मिरवणुका सुरू असत. सभेत गाणी म्हटली गेली. कासिमने

कहाँ छुपा है श्रीभगवान
हम भुके है हैराण ॥कहाँ॥
मंदिरमें से नहिं कोई आया
मस्जिदमें से नहिं कोई आया
लाल झंडेसे आधार पाया
वही झंडा है हमारा प्राण ॥ कहाँ॥

हे स्वतःकेलेले गाणे म्हटले. हजारो मजूर मरत होते. परंतु त्यांची बाजू घेऊन उठणे धर्म आहे असे हिंदुमहासभेला वाटले, न मुस्लिम लीगला वाटले, न धर्ममार्तंडाला वाटले, न धर्मभास्करांना वाटले, न वाद्ये थांबविणार्‍यांना वाटले, न वाद्ये वाजविणाऱंना वाटले. तृषिताला पाणी देणे व भुकेल्यांना अन्न देणे हा पहिला धर्म आहे. त्यातल्या त्यात श्रम करणार्‍याला अन्न पोटभर देणे हा तर अधिकच पवित्र व श्रेष्ठ धर्म; परंतु त्याच्याच तर सर्वांना विसर पडला आहे. धर्माच्या नावाने ओरडणारे त्या कामगारांना शिव्या देत होते व मालकांना आशीर्वाद देत होते.

क्रांती