सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

२७. हिंसा-अहिंसा

दवाखान्यात मोहन मरणशय्येवर होता. शांतेची मुलगी लहान.  परंतु मुलीला घरी ठेवून ती दवाखान्यात येत असे. शांतेने आपल्या आईला बोलाविले; परंतु रामराम पत्नीला पाठवण्यास तयार नव्हते. शांतेच्या लग्नाला जरी ते गेले होते तरी तिच्या झोपडीत तिचा संसार पाहावयास ते कधीही आले नाहीत. शांतेने गीतेला बोलाविले. गीता आली. गीता लहानग्या क्रांतीला पाळण्यात आंदुळी. गीता तिला मांडीवर घेई, पायांवर ठेवी. गीतेच्या अंगावर, गीतेच्या आधाराने वाढणारी क्रांती, तीच खरोखर क्रांती. ती क्रांती मरणार नाही. गीतेच्या पायांवर वाढणारी क्रांती त्रिभुवनव्यापी होईल.

मोहन पडून असे. ''संपाचं काय झालं?'' मध्येच विचारी. एखादे वेळेस शांता जवळ बसलेली पाहून म्हणे, ''मी म्हटलंच होतं, की तिकडे कामगार मरतील; परंतु तू माझा हात हातात घेऊन बसशील. ऊठ, जा. तिकडे. मोहन मरू दे, मजूर जगू दे.'' शांतेचे डोळे भरून येत व मोहनच्या हातावर ती अश्रूंचे अर्घ्य देई. स्वतःच्या प्राणांचे पाणी देई.

मोहनची आशा नव्हती. श्रमाने मोहन थकलेला होता. शांतेचे लग्न झाल्यावर जरी तो बरा झाला होता, वजन जरी वाढले होते तरी तो खरा बरेपणा नव्हता. या  संपात फारच दगदग झाली. संपाच्या आधीही खूप काम. त्याला ते अतिश्रम झेपले नाहीत. अशा पोखरलेल्या शरीराला ते जिन्यावरून पडणे म्हणजे मोठाच आघात होता. तेव्हाच तो राम म्हणावयाचा. परंतु मरण तयार नव्हते. वरचे वॉरंट लिहिलेले नव्हते.

मुकुंदराव मोहनची प्रकृती पाहावयास आले होते. शांता तेथे बसली होती. ती मुकुंदरावांस म्हणाली, ''आज काही बरं लक्षण दिसत नाही. यांना घरी घेऊन जावं, स्वतःच्या झोपडीत न्यावं, येथे नको.'' मुकुंदराव बरं म्हणाले. मोहनने विचारले, ''संपाचं काय?'' मुकुंदराव म्हणाले, ''सुरू आहे.'' तो क्षीण स्वरात म्हणाला, ''किती दिवस उपाशी राहणार? माझ्या डोळयांसमोर त्यांचे उपाशी चेहरे सारखे दिसत असतात. मी आता देवाकडे जातो फिर्याद घेऊन.'' शांतीने मोहनच्या मुखकमलावरून हात फिरविला, त्याच्या डोक्यावरून हात फिरविला.

''मोहन, तुला घरी नेणार आहोत.'' मुकुंदराव म्हणाले.

''होय. घरी न्या. मी आता घरी जायला उत्सुक आहे. देवाच्या घरी. झोपडीतून देवाकडे लवकर जाता येईल. शांतेची गरीब पवित्र झोपडी. न्या, मला घरी न्या.'' तो म्हणाला.

एका मोटारीत मोहनला अलगद उचलून ठेवण्यात आले. शांता मांडीवर डोके घेऊन बसली होती.

''मोटार कशाला आणलीत? गरिबांच्या अंगावरून जाणार्‍या मोटारी; मोटारीतून माझ्या घरी का लवकर जाईन? त्या वरच्या माहेरी का लवकर पोचेन?'' त्याने विचारले.

''तुम्ही बोलू नका.'' शांता दीनवाणी होऊन म्हणाली.

''नको बोलू? तुझी आज्ञा. आता बोलणं बंदच होईल. देवाचीही तीच आज्ञा होणार आहे. बोलणे नाही, आता देवावीण काही' असा दयाराम एक अभंग म्हणत असतो.'' मोहन म्हणाला.

झोपडीजवळ मोटार आली. मोहनला अंथरुणावर ठेवण्यात आले. स्वच्छ साधे अभ्यास, तेथेच सारे.

क्रांती