रविवार, ऑक्टोबंर 25, 2020
   
Text Size

महात्माजींनीं सांगितले तें ऐकलेंत कां?  डॉक्टरने सांगितलेलें औषध घ्यावयाचें नाहीं व रोग हटत नाहीं म्हणावयाचें, याला चावटपणा म्हणतात.   स्वराज्याच्या तयारीच्या चार गोष्टी महात्माजींनीं सांगितल्या होत्या.  अस्पृश्यतानिवारण, हिंदु-मुस्लिम ऐक्य, दारूबंदी व खादी.  यांतील कोणती गोष्ट हिंदुमहासभावाल्यांनीं केली!  जर केली नसेल तर महात्माजींस दोषहि देतां येणार नाहीं.  हिंदुमहासभा हिंदूंचा तरी कैवार घेईल असें वाटत होतें.  परंतु अस्पृश्यांचे बाबतीत काय?  स्वातंत्र्यवीर सावरकर दूर ठेवा ; तुम्ही काय करीत आहांत?  हरिजनांना माणुसकी द्या.  अमळनेरच्या वाडींत त्यांना घेऊन जा.  त्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करा.  त्यांच्यासाठीं छात्रालयें काढा.  मुडी येथें एका हरिजनावर तेथील मंडळींनी अत्याचार केला.  तेथे मुसलमान नव्हते, हिंदूच होते.  जळगांवचे, धुळयाचे, एरंडोलचे, अमळनेरचे सारे हिंदुमहासभावाले वकील तेथें धांवून गेले नाहींत.  जे हिंदुमहासभावाले अस्पृश्यांस माणुसकी मिळावीं म्हणून झटत नाहींत, त्यांना दुस-यांस नांवे ठेवण्याचा अधिकारच नाहीं.

हिंदुमुस्लिम ऐक्य करा महात्माजी म्हणतात.  महात्माजी मुसलमानांस कोरा चेकहि देण्यांस तयार आहेत ; जर ते स्वातंत्र्यासाठी लढतील तर.  लोकमान्यहि असें म्हणत.  मुसलमान येथें राजें झाले तरी चालतील परंतु हा इंग्रज नको असें ते म्हणत.  हिंदुमुस्लिम ऐक्याची जरूर सर्वांना वाटते.  त्यासाठीं वाटेल ती किंमत द्या असें सेनापति बापट म्हणतात.  बंगालमध्यें  १९२४ मध्यें प्रांतिक कायदे कौन्सिलांत सरकारचा पराजय करतां यावा म्हणून देशबंधु दास यांनी हिंदुमुस्लिम करार केला.  ज्याला ज्याला हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असें वाटतें त्याला या एकीची नितांत आवश्यकता पटते.  ९ कोटि मुसलमान व ६ कोटि अस्पृश्य असे १५ कोटि लोक जवळ न आले तर ब्रि. सरकार त्यांना जवळ करणार.  आपण दोन जागा देऊं म्हटलें तर इंग्रज ३ देतों म्हणणार.  हा हिशोब हास्यास्पद होणार.  म्हणून लो. टिळक, महात्मा गांधी कोरा चेकहि जरूर तर घ्या असें म्हणावयास सिध्द होतात.

अस्पृश्यतानिवारण व हिंदु-मुस्लिम ऐक्य या महात्माजींनी स्वराज्यासाठीं २ अटी सांगितल्या.  त्या जर पार पाडीत नसाल तर ते स्वराज्य कोठून देणार? हिंदुमहासभावाल्यांचे अस्पृश्यतेकडे लक्ष नाहीं, हिंदु मुस्लीम ऐक्याकडे लक्ष नाही, मग महात्माजींवर रागावून काय होणार!

दारुबंदी व खादी.  दारुबंदी आज काँग्रेसने हातीं घेतली आहे.  त्याला संपूर्ण पाठिंबा द्या.  आणि खादी? तिची तर टिंगल केली जाते.  कोणी म्हणतात कीं त्यामुळें मुसलमानांसहि धंदा मिळतो.  मिलमध्यें मुसलमान नाहींत का?  आतां केवळ सनातनी हिंदूंची गिरणी काढा म्हणावें.

गोड निबंध - भाग २