शनिवार, मे 30, 2020
   
Text Size

“राजा, तुझ्यासाठी मी देवाची प्रार्थना करीन. परंतु तू सुद्धा मी सांगेन तसे केले पाहिजे. औषध घेतले पाहिजे. पथ्यपाणी सांभाळले पाहिजे.” साधू म्हणाला.

“कोणते औषध घेऊ ? जो उपाय सांगाल तो करीन. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन.” राजाने सांगितले.

साधू म्हणाला, “राजा, तुझ्या सर्व अधिका-यांना प्रजेशी नीट वागण्याची आज्ञा दे. प्रजेवर किती तरी नवीन नवीन कर बसविण्यात आले आहेत, ते सारे कमी कर. शेतसारा फार वाढला आहे, तोही माफ कर. रस्ते नीट बांध. दवाखाने ठायी ठायी घाल. उद्योगधंद्याच्या शाळा काढ. त्याने बेकारी कमी होऊन लोक सुखी होतील. ठिकठिकाणी पाटबंधा-यांची कामे सुरु कर. कालवे वाढव. तसेच लाचलुचपतीस आळा घाल. जंगलातील गवत, वाळलेले फाटे लोकांना मोफत नेऊ दे.”

अरे, प्रजा सारी दुःखी आहे. ती दुःखी असता तुला कोठून सुख ! सारी प्रजा तुझ्या नावाने खडे फोडीत आहे. मी जेथे जातो तेथे हायहाय ऐकू येत. रोग वाढले, दारिद्र्य वाढले. मरणाचा सुकाळ झाला. ‘असा कसा हा राजा, असा कसा हा राजा !’ असे सारे बोलतात. म्हणून हो तुझ्या शरीराला ही व्याधी ! तू नीट वाग, प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे पाळ म्हणजे बघ चमत्कार होईल. रोग पळून जाईल. तू बरा होशील.”

मंत्री म्हणाले, “साधू महाराज, राजाच्या दुखण्याचा राज्यकारभाराशी काय संबंध ? राज्यकारभार कसा चालवावा ते सांगायला आहेत मंत्री. तुम्ही एखादे औषध सांगा. झाडाचा पाला, एखादी मुळी, नाहीतर अंगारा असे काही द्या. राजाच्या दुखण्याची थट्टा नका करु.”

साधू म्हणाला, “मला उपाय माहीत आहे तो सांगितला. दुसरे उपाय मला माहीत नाहीत. जडीबुटी मजजवळ नाही. राजाच्या दुखण्याची मी थट्टा नाही करीत. मी खरे ते सागितले. दुस-याच्या दुःखाची थट्टा करणारा साधू कसा असेल ? मी तसा असेन तर माझी प्रार्थना तरी देव कसा ऐकेल ?”