गुरुवार, ऑक्टोबंर 29, 2020
   
Text Size

अघटित घटना

'ती एकटी असते.' एक जण म्हणाली.

'नवरा वगैरे नाही वाटतं?' दुसरी म्हणाली.

'तिचं कोणीच नाही का कुठं?' तिसरीने विचारले.

'ती पोस्टात जाते व कोणाला तरी पैसे पाठवते.' चौथी म्हणाली.

'कोणाला पाठवते पैसे? काही तरी काळंबेरं आहे. चांगल्या चालचलणुकीची दिसत नाही ही बाई.' पाचवी म्हणाली.
बायांची अशी बोलणी एके दिवशी चालली होती. पोस्टात जाऊन बातमी काढण्याचे एकीने ठरविले. शेवटी त्यांना कळले की, एका मुलीला पैसे पाठविण्यात येतात. कोण ही मुलगी? ही का पैसे पाठवते? हिचीच असेल मुलगी? मग ही त्या मुलीला येथे का आणीत नाही? नवरा कोठे आहे? काही तरी भानगड आहे खास.

लिलीची आई कारखान्यात जाताच सार्‍या बाया तिच्याकडे बघत. कोणी नाके मुरडीत. कोणी फिदीफिदी हसत;  परंतु ती शांतपणे काम करू लागे. होता होता या गोष्टींची फारच वाच्यता होऊ लागली. एके दिवशी मुख्य बाई लिलीच्या आईला म्हणाली, 'येत्या एक तारखेपासून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. वाईट चालीच्या बायका इथं नकोत.'
'परंतु मी वाईट चालीची नाही. वाईट चालीची असते तर इथं भीक मागत आल्ये नसते. दिवसभर राबत बसले नसते. मी सुंदर होते. अजूनही सुंदर आहे.' ती म्हणाली.

'मला जास्त बोलायचं नाही. इथं शिस्त राहिली पाहिजे. सार्‍या बाया तुमच्या नावानं बोलतात. तुम्ही गेलेल्याच बर्‍या.' मुख्य अधिकारीण म्हणाली.

'माझ्या लिलीचं कसं होईल? मी तिला कोठून पाठवू पैसे? तिच्यासाठी हो सारं. मी एकटी असते तर कधीच जगाला रामराम केला असता. नका मला घालवू.' ती म्हणाली.

'सांगितलं ना की, इथं पापी माणसं नकोत म्हणून? जा नीघ. का शिपायाकडून घालवू?' ती मुख्य बाई दरडावून म्हणाली.
लिलीची आई दु:खाने बाहेर पडली. 'आता कुठं पाहायचं काम? कारखान्याचा मालक उदार म्हणतात; हाच का त्याचा उदारपणा? मला काढून टाकलेलं त्याला का माहीत नसेल? त्याच्या परवानगीनं सारं होत असेल. का काढलं त्यानं मला? कोणता माझा अपराध? काय केलं मी? अरेरे! आता कुठं जाऊ मी? कोण देईल मला काम?'

 

पुढे जाण्यासाठी .......