गुरुवार, ऑक्टोबंर 22, 2020
   
Text Size

अघटित घटना

'आता इथं व्यवस्था होईल, शांत पडून राहा,' तो उदार पुरुष तिला म्हणाला.

'माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे,' ती म्हणाली.

'कोणती?' त्याने विचारले.
'माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या. तिला इथं आणा,' ती डोळयांत पाणी आणून म्हणाली.

'परंतु मला कशी देणार? तुमच्या सहीचं पत्र हवं,' तो म्हणाला.

'द्या कागद व शाई; मी देते पत्र लिहून,' तिने सांगितले.

ती तापाने फणफणत होती. तरी तिने त्या खाणावळवाल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रात 'ही चिठ्ठी घेऊन येणार्‍यांबरोबर मुलीला पाठवावं;' असे लिहिले. त्या उदार पुरुषाने चिठठी खिशात घातली.

'बरं मी जातो. तुमची मुलगी तुम्हाला भेटवीन,' तो म्हणाला.

'देव तुमचं कल्याण करो!' ती अंथरुणावर पडून म्हणाली.

तो उदार पुरुष घरी गेला. तो नगरपालिकेचा अध्यक्ष होता. बराच वेळ तो घरी काम करीत होता. रात्रीही लिहीत बसला होता. बर्‍याच उशीरा तो झोपला, सकाळीही जरा उशिराने उठला.

सकाळचे विधी संपवून तो आपल्या खोलीत वर्तमानपत्रे चाळीत बसला. एका वर्तमानपत्रातील मजकुराने त्याचे लक्ष वेधून घेतले. मोठया अक्षरांत ती बातमी होती -

'अपूर्व खटला. कित्येक वर्षांपूर्वी एक चोर पळून गेला होता. पोलिसांनी एका माणसाला पकडले आहे; परंतु तो माणूस म्हणतो, 'मी तो चोर नव्हे. मी कधीही तुरुंगात नव्हतो.' पोलिस म्हणतात, 'तूच तो.' त्या खटल्याचा आता निकाल लागायचा आहे. पाहावे काय होते ते.'

अशा अर्थाचा तो वृत्तान्त होता. उदार पुरुषाने तो पुन्हापुन्हा वाचला. त्याने ते वर्तमानपत्र खाली ठेवले. त्याची  चर्या गंभीर झाली; परंतु त्याने झटपट काही तरी निश्चय केला. त्याने नोकराला बोलाविले. तो आला.

'काय रे, रायगावला चपळ घोडयावरून जायला किती वेळ लागेल?'

'चार तास तरी लागतील.' नोकर म्हणाला.

'आपल्या घोडयांतील सर्वांत चपळ असा घोडा तयार ठेव. मी काम आटोपतो. त्या गावी मला जायचं आहे.'

 

पुढे जाण्यासाठी .......