बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

यतिधर्माची दीक्षा

बुध्दभिक्षूंच्या मठात एका पलंगडीवर विजय पडला होता. आपण येथे कसे आलो, पुरात वाहात जाऊन कोठे लागलो ते त्याला काही आठवत नव्हते. तो विचारमग्न होता. मध्येच तो डोळ उघडी. मध्येच तो डोळे मिटी.

इतक्यात मठाधिपती तेथे आले.

'बेटा, आली का नीट शुध्द?' त्यांनी प्रेमाने विचारले.

'होय महाराज; परंतु मी येथे कसा आलो?' त्यांनी प्रेमाने विचारले.

'गंगेला मोठा पूर आला होता. हजारो लोक वाहून गेले. गाईगुरे वाहून गेली. मठातील सारे भिक्षू बाहेर पडले. ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवू लागले. एक ठिकाणी तू सापडलास. तुला त्यांनी उचलून आणले. तू वाचलास. तू शुध्दी येत नव्हतास. तू आपोआप हळुहळू शुध्दीवर येशील असा माझा तर्क होता. आता बरे वाटते ना? तुझे घर कोठे आहे? गाव कोणता? घरी वाट पाहात असतील तुझी माणसे.'

'महाराज, मला कोणी नाही. माझ्या जीवनात अर्थ नाही. जगयाची इच्छा नाही. तुम्ही उगीच या अभाग्याला तुमच्या पुण्यमय संस्थेत आणलेत.'

'असे नको बोलू. ज्या जीवनातील अर्थ नाहीसा झाला, तो जगेल कशाला? तू वाचला आहेस, यावरून तुझ्या जीवनात अर्थ आहे. तू एकटाच असशील, तुझ्यावर कोण अवलंबून नसेल तर तू आमच्या मठात ये. आमचा हा भ्रातृसंघ आहे. जगाची सेवा करावी हा आमचा धर्म. दुष्काळ आला, रोग आले, पूर आले तर आम्ही सर्वांच्या सेवेसाठी धावतो. आम्ही गावोगाव जातो. प्रेमधर्माचा प्रचार करतो. भेदभाव दूर करतो. चोर, दरोडेखोर, खुनी जे कोणी भेटतील त्यांना उपदेश करतो. राजाच्या तुरुंगात जातो. कैद्यांना दोन शब्द सांगतो. राजदरबारात जातो. त्यांना प्रजेचे कसे कल्याण करावे ते सुचवतो. असा हा भ्रातृसंघ आहे. तुम्ही निराश नका होऊ. जगात अपंरपार दुःख आहे. ते जोपर्यंत दूर करायला आहे, तो पर्यंत माणसाने जगण्यात अर्थ नाही असे म्हणू नये. तुम्ही विचार करा.' असे म्हणून विजयच्या मस्तकावरून हात फिरवून मठाधिपती गेले.

 

पुढे जाण्यासाठी .......