सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

मोरू

मनुष्य- ‘सारे लोक माझी फुले व फळे तोडून नेतात. एक सुद्धा माझ्याजवळ ठेवीत नाहीत. सारे मला लुटतात. परंतु मला पाणी कोणी घालीत नाही. माझ्या मुलांना खाली अंधारातून पाण्यासाठी किती लांबवर धडपडत जावे लागते. परंतु माणसांना माझे कष्ट दिसत नाहीत. खुशाल येतात, दगडधोंडे मारतात. फुले तोडतात, फळे पाडतात, पाने ओरबाडतात,’ असे म्हणून झाड सारखे रडत
आहे.

मोरू- ती गाय का रडत आहे?

मनुष्य- तिला प्यायला पाणी नीट मिळत नाही, खायला पोटभर मिळत नाही. तिचा मुलगा गाडीला जोडतात. नांगराला जोडतात. व त्याच्या अंगात बोट बोट खोल आर भोसकतात! बिचारा बैल! त्याला नाही पोटभर दाणावैरण. तो किती ओढील? किती चालेल? मुलाचे हे हाल पाहून गाय रडत आहे. स्वत:च्या दु:खाचे तिला फारसे वाटत नाही, परंतु मुलाच्या दु:खाने ती
वेडी झाली आहे. तिच्या डोळ्यांतील पाण्याचा भूमातेवर अभिषेक होत आहे.

मोरू- तुम्हाला ऐकु येते, तसे मलाही येऊ दे. मला ही शक्ती द्या. मनुष्य- मनुष्य विचारी झाला, मनाने निर्मळ झाला की, त्याला ही शक्ती येते. सर्व चरचराची भाषा त्याला समजू लागते, तारे आणि वारे, पशू आणि पक्षी, दगड, नद्या आणि नाले, झाड आणि माड सा-यांची सुख-दु:खे मग तो जाणतो. तुमच्या गावातील नदी तर सारखी रडते. तिचे पाणी ते तिच्या अखंड गळणा-या आसवांचेच जणू आहे.

मोरू- ती काय म्हणते?

मनुष्य- लोक तिच्यात घाण करतात. जणू तिचं सत्वच पाहतात. तिच्यात शौच करतात. लघवी करतात! शेतातील शेंगा वगैरे आणून तिच्या पात्रात धुतात, सारे पाणी घाण करतात. तिला
का बरे वाईट वाटणार नाही? परवा तहानलेली पाखरे चोच वासून आली; परंतु त्यांनाही ते पाणी पिववेना; तहानलेली वांसरे आली; परंतु पाणी हुंगून निघून गेली. माणसाला शिव्याशाप देत ती निघून गेली. सारी सृष्टी आज माणसाला शिव्याशाप देत आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......