सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन

“मला जेव्हा जे शक्य होईल तेव्हा या दुष्ट चालीवर मी घाव घातल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच घाव घालीन.” असे निर्धाराचे उद्गार लिंकनच्या तोंडून बाहेर पडले. एका स्टेशनावर निग्रो गुलाम उभे केलेले होते. त्यातील एका स्त्रीला चालवून बघत होते. जणू एखादे ढोर विकत घ्यायचे होते. आफ्रिकेतून निग्रोंना गुलाम करून अमेरिकेत आणून विकण्यात येई. त्या हालांची कल्पनाही करता येणार नाही.

जगातून ती प्रथा चालली होती. परंतु अमेरिकेत ती अजून होती. लिंकनच्या हातून तिला मुठमाती मिळायची होती. मानवजातीच्या त्या थोर उद्धारकर्त्याचा १२ फेब्रुवारी १८०९ मध्ये जन्म झाला. त्याचे आईबाप गरीब होते. वडिलांना शिक्षण कधीच मिळाले नव्हते. कारण लिंकनचे वडील सहा वर्षांचे असतानाच पितृहीन झाले होते, लिंकनची आई तो १० वर्षांचा असतानाच वारली. बापाने पुन्हा लग्न केले. परंतु सावत्र आईने लिंकनला छळले नाही. लिंकनचे नाव अब्राहम. प्रेमाने त्याला ‘अबे’ म्हणण्यात येई. अबे शेतात काम करी. परंतु वेळ मिळताच पुस्तके वाची. त्याला ज्ञानाचे वेड होते. तो म्हणे : “वडिलांनी मला काम करणे शिकविले. परंतु कामावर प्रेम करायला नाही शिकविले.” दिवसभर तो काम करी. कामानंतर बरोबरच्या मित्रांना किंवा मुलांना गोष्टी सांगे. एकदा एक शेजारीण म्हणाली, “गप्पा मारतोस! तुझे व्हायचे काय पुढे?”

“मी अमेरिकेचा अध्यक्ष होईन.” तो म्हणाला.

लिंकन महत्त्वाकांक्षी होता. आरंभी लेखक व्हायची त्याची इच्छा होती. तो सृष्टीचा बाळ होता. नद्या, जंगले, हिरवे गवत, शेते-भाते यांत वाढलेला तो कविता लिही. परंतु ते काव्य दूर राहिले आणि राजकारणातील कृतिमय काव्य लिहिणारा तो महाकवी झाला.

राजकारणात शिरला
तो निवडणुकीस उभा राहिला. एकदा पडला. परंतु पुन्हा कधी पडला नाही. तो लोकांना आवडे. तो त्यांच्यातील होता. त्याच्याइतका जीवनाचा विविध अनुभव कोणाला होता? तो शेतमजूर, होडीवाला, लाकूडफोड्या, खाटीक, स्टोअरकीपर अनेक कामांतून गेला होता. अनेक निरक्षर लोकांची तो पत्रे लिहून द्यायचा. त्यांची सुख-दु:खे तो आपल्या सोप्या भाषेत लिही. असा हा लिंकन गरिबांचा कैवारी होता. पुढे त्याने वकिलीची परीक्षा दिली.

 

पुढे जाण्यासाठी .......