सोमवार, एप्रिल 06, 2020
   
Text Size

जर्मन महाकवी गटे

उत्क्रांतीचा भक्त
गटे उत्क्रांतीचा भक्त होता. अव्यवस्था, अराजक, त्याच्या प्रकृतीस मानवत नसे. स्पर्धा-बंडाळीत अर्थ नाही. तो म्हणे, “उत्क्रांतीत ईश्वरता आहे; कर्मशून्यतेत किंवा उत्पातात नाही.”

मृत्यू जवळ आला
मधून मधून त्याला स्फूर्ती येई किंवा अर्धवट राहिलेले भाग तो पुरे करी. पर्शियन आणि अरेबिकही तो अभ्यासू लागला. फिर्दोसी, हाफीज त्याला आवडायचे. अरबस्तान, इराण इकडे तो हिंडून आला. तो चिरयुवा होता. वाढत्या वयाबरोबर वाढती कर्मक्षितिजे. वेदांचा काव्यात्मक अनुवाद करायची त्याला इच्छा होती. चिनी काव्यही वाचू लागला. परंतु ८० वर्षे होत आली. त्याची प्रिय माणसे मरण पावली. एकुलता मुलगाही गेला. परंतु तो लिहितो : “अशा प्रसंगी कर्तव्याच्या कठोर जाणिवेनेच आपण पुन्हा शांत होतो व काम सुरू करतो. अनेकांच्या मरणांवरून पुढेच जायचे असते.” (Forward over the graves)  मरणाच्य़ा थोडे दिवस आधी कधी उसळली नव्हती अशी सर्जनशक्ती संचारली. ‘फौस्ट’चा शेवटचा भाग लिहिला. तिकडे नाटकात फौस्ट आंधळा होतो, दिवाणखान्यात फे-या घालतो आणि इकडे गटेही वृद्ध परंतु विचाराने चिरयुवा शेवटच्या ओळी विहीत आहे. आणि इलमेनो या रम्य स्थळी तो जाऊन येतो. पुष्कळ वर्षांपूर्वी तो तेथे गेला होता. डोंगरावर एक झोपडी होती. तेथे त्याने कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी तशाच होत्या : ‘डोंगरावर सर्वत्र शांतीचे राज्य आहे. वारा शांत आहे. पाखरांनीही सारे आवाज बंद केले आहेत. अधीर नको होऊ. तूही शांत हो. लौकरच तुलाही चिरशांती लाभेल!” अशा त्या ओळी. त्याचे डोळे भरून आले. अनंत स्मृती; परंतु डोळे पुसून, “तुलाही चिरशांती लौकरच लाभेल!” हे शब्द उच्चारीत तो घरी आला. अती सुंदर गीते या अखेरच्या दिवसांत त्याने लिहिली. थोर जर्मन कवी हायना म्हणतो, “या गीतांतील शब्द आपणास जणू मिठी मारतात आणि त्यातील अर्थ चुंबन घ्यायला येतो.” त्याचा इतर अभ्यास चालूच होता. ते बघा टेबल. त्याच्यावर नुकतेच सापडलेले प्राण्यांचे प्राचीन अवशेष आहेत. हत्तीचे दात आहेत. काही वनस्पतींचे प्रकार आहेत. त्याची सर्वगामी जिज्ञासा जागृत आहे. तो आपल्या राजनिशीत लिहितो: “जेनाच्या वेधशाळेतील ज्योतिर्वेत्ते दोन वर्षांनी दिसणा-या धूमकेतूच्या स्वागताची तयारी करीत असतील... पृश्वी सूर्याभोवती फिरत आहे, हा केवढा भव्य शोध मानवाने लावला. सारी बायबले एकत्र केली, तरी त्यांच्याहून हा शोध महत्त्वाचा आहे!”

 

पुढे जाण्यासाठी .......