गुरुवार, एप्रिल 02, 2020
   
Text Size

चीनचे जनक सन्यत्सेन

परदेशात राहून सन्यत्सेन सर्व प्रकारच्या जागृतीस चालना देत होता. चिनी लांब शेंड्या दिसेनाशा झाल्या. स्त्रियांचे पाय मोकळे झाले. अफूविरोधी प्रचंड चळवळ सुरू झाली. परदेशी मालावर बहिष्कार व स्वदेशीचा पुरस्कार होऊ लागला. सन्यत्सेनच्या ‘तुंग मेंग हुई’ संस्थेचे जाळे चीनभर होते. तालुक्या-तालुक्याला शाखा होत्या. वेळ येताच ठायी ठायी हजार-पाचशे तरुण सत्ता हाती घ्यायला उभे राहतील अशी तयारी होती.

बंड पेटले
चिनी सम्राट सुधारणांस अनुकूल होता, परंतु राजमाता व दरबारी विरुद्ध होते. सुधारणेच्या फुसक्या घोषणा होत, परंतु प्रत्यक्षात शून्य. हा दुर्दैवी सम्राट मरण पावला. त्याची आईही मेली. नवीन राजकुमार गादीवर आला. १४ ऑक्टोबर १९०९ रोजी प्रांताप्रांतांनी सुधारणांची मागणी केली. पुढे नॅशनल काँग्रेस भरून, तिनेही सुधारणांचा मसुदा पाठवला. परंतु सरकार काही करीना. अखेर चेंगटू भागात बंड सुरू झाले व त्याचा वणवा भडकला. विद्यार्थी खेड्यांतून जाऊन शेतक-यांना उठवते झाले. जवळ शस्त्रे नव्हती. परंतु अपार उत्साह होता. नवीन स्वातंत्र्यगीत जन्माला आले व ते चीनभर गेले: “ये, स्वातंत्र्यदेवते, ये. स्वर्गातील तू परमश्रेष्ठ वस्तू. तू पृथ्वीवर ये. स्वर्गीतून पृथ्वीवर येशील तर चमत्कार करशील, अपार कार्य करशील. मेघांच्या रथाला वा-यांचे घोडे जुंपून ये. आम्ही अंधारात आहोत, तू प्रकाश आण. अहोरात्र आमच्या मनात मातृभूमीची दु:खे आहेत; तिच्या मुक्तीची स्वप्ने आहेत. स्वतंत्रते, तू का येत नाहीस? तू का मेलीस? सारा आशिया उदध्वस्त व उजाड झाला आहे, अरेरे!!”

नवसम्राटाचा युआन शिकाई सल्लागार होता. ४ नोव्हेंबर १९१० रोजी त्याने सम्राटाकडून घोषणा करविली की, तीन वर्षांच्या आत तुमच्या मागणीप्रमाणे पार्लमेंट बोलावू. परंतु सरकारी शब्दांवर कोणाचा विश्वास नव्हता. प्रांत स्वतंत्र होऊ लागले. सरकारी सेनापतीही क्रांतिकारकांस मिळू लागले. सन्यत्सेनचा कर्मवीर मित्र हुआंग सिंग विजयामागून विजय मिळवीत होता. चँक कै शेकही सहकारी सेनापती होता. जपानमध्ये तो विद्यार्थी होता. सन्यत्सेनने त्याला चळवळीत ओढले. १९११ च्या २१ डिसेंबरला १९ प्रांतांचे ३० प्रतिनिधी नानकिंग येथे जमले व अमेरिकन पद्धतीचे रिपब्लिक स्थापण्याची त्यांनी घोषणा केली. पहिला अध्यक्ष कोण होणार? सन्यत्सेनना तार करण्यात आली. ते निघाले. वाटेत जागोजाग त्यांचा सत्कार करण्यात आला. सिंगापूर, हाँगकाँग, शांघाय सर्वत्र प्रेमाचे स्वागत. नानकिंग येथे येताच तोफांची सलामी देण्यात आली. त्यांनी राष्ट्रपतीचे स्थान घेतले व “मी जुनी राजवट नष्ट करून प्रजातंत्र दृढ करण्यासाठी झटेन,” अशी शपथ घेतली.

 

पुढे जाण्यासाठी .......