बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

जन्मभूमीचा त्याग

विनूने रक्ताने माखलेला सुरा मनूच्या उशाशी ठेवून दिला. मनू झोपलेला होता. विनू मुकाट्याने आपल्या घरी जाऊन पडला. सकाळ झाली. प्रवासी मरून पडलेला दिसला. सर्व गावभर वार्ता गेली. कोणी केला तो खून? कोणी केले ते पाप?

मनू जागा झाला. त्याच्या उशाशी रक्ताने माखलेला सुरा होता; तो दचकला. तो सुरा हातात घेऊन तो वेड्यासारखा बाहेर आला. लोक त्याच्याकडे पाहू लागले.

“हा पाहा लाल सुरा, रक्तानं रंगलेला सुरा! कुणाचं हे रकत? कुठून आला हा सुरा? माझ्या उशाशी कुणी ठेवला? लाल लाल सुरा.” असे मनू बोलू लागला.

“यानंच या प्रवाशाचा खून केला असेल.”

“आणि स्वत: साळसूदपणा दाखवीत आहे.”

“त्याला खून करून काय करायचं होतं?”

“देवाला माहीत. एकटा तर आहे. पैसे हवेत कशाला?”

“लोभ का कुठं सुटतो?”

असे लोक म्हणू लागले. मनूला काही समजेना. तो वेड्याप्रमाणे बघू लागला.

“मी कशाला कोणाला मारू? मी आधीच दु:खाने मेलो आहे. मला कशाचीही इच्छा नाही. ना धनाची, ना सुखाची! कोणी तरी हा सुरा माझ्या उशाशी आणून ठेवला असावा. स्वत:चं पाप या गरीब मनूवर ढकलीत असावा.” मनू म्हणाला.

त्याच्या म्हणण्याकडे कोणी लक्ष देईना. शेवटी देवळात सारे लोक जमले. मनू तेथे दु:खाने हजर राहिला. मनूनेच तो खून केला असावा, असे सर्वांचे मत पडले. मनूची मान खाली झाली होती. ईश्वराने त्याचे आईबाप नेले होते; त्याची बहीण नेली होती. आता त्याची अब्रूही परमेश्वर नेऊ पाहात होता; जीवनातील सर्वांत मोठी मोलवान वस्तू. तीही आज जात होती. मनूने विनूकडे पाहिले. परंतु विनू त्याच्याकडे पाहीना. आपला मित्र तरी आपणांस सहानुभूती दाखवील असे मनूस वाटत होते. परंतु तीही आशा का विफळ होणार?

 

पुढे जाण्यासाठी .......