शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020
   
Text Size

लिलीची भेट

'खाणावळवाला तर सारखं मारतो मला.'

'तू का खाणावळवाल्याकडे असतेस?'

'हो.'

'तुझे आईबाप कुठं आहेत?'

'आई आता नाही. ती मागं माझ्यासाठी पैसे पाठवी; परंतु बरेच वर्षांत आले नाहीत. खाणावळवाला म्हणाला, 'तुझी आई मेली.' तो मला सारखं काम करायला लावतो. 'फुकट का खायला घालू?' असं म्हणतो. पहाटे चार नाही वाजले तो मला उठावं लागतं, थंडीत मी गारठते; परंतु मला काम करावं लागतं. माझे हातपाय फुटतात; परंतु कुरकुर केली तर चाबकाचा मार. मला भांडी घासावी लागतात. या झर्‍यावरून पाणी न्यावं लागतं. आई नसली म्हणजे असं होतं. कुठं गेली माझी आई? का गेली ती मला सोडून? मी तिच्याजवळ राहिले असते. तिच्याबरोबर मेले असते. कुठं आहे माझी आई?'

ती मुलगी रडू लागली. त्या वाटसरूच्याही डोळयांत पाणी आले.

'उगी बेटा. रडू नकोस. तुझं नाव काय?'

'लिली.'

'किती गोड नाव!'

'जाऊ दे आता मला. उशीर झाला तर मारतील.'

'थांब, मीही तुझ्याबरोबर येतो. मला कोणत्या तरी खाणावळीतच उतरावयाचं आहे. तुझ्या खाणावळीत उतरू?'

'हं उतरा आणि माझ्याबरोबर चला. एक गि-हाईक मी मिळवून आणलं असं पाहून त्याचा राग कमी होईल. चला.'
'तुझी घागर जड आहे. दे, मी घेतो.'

'तुम्ही कशाला घेता? तुम्ही इतके कसे दयाळू? अशी दयाळू माणसं जगात असतात?'

'कुठं कुठं असतात. दे, खरंच दे घागर.'

'परंतु मालकानं पाहिलं तर तो रागावेल.'

'तुझी खाणावळ आली, म्हणजे पुन्हा तुझ्या कमरेवर ती मी देईन. समजलं ना? दे बाळ.'

 

पुढे जाण्यासाठी .......