सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

इस्लामाच्या आगमनानंतर

वेदकालीन नि उपनिषदकालीन स्त्री मागे पडली. मोकळेपणा गेला. ते प्रौढविवाह गेले. ज्ञानार्जनाची सवलत गेली. बालविवाह रुढ झाले. पती हाच गुरु झाला. तोच देव. त्याच्या हाताला हात लावला की सारे झाले. स्त्रियांचे स्वातंत्र्य, अस्तित्वच जणू लोपले. पती निवर्तला तर आमरण व्रतस्थ राहावयाचे. मग ती बालविधवा का असेना. तिला संन्यासिनी, व्रतस्थ करण्यात आले. केशवपनासारख्या चाली रुढ झाल्या. मारुन मुटकून वैराग्य देण्यात येऊ लागले. तिच्या मनात वासना येऊ नयेत, सुखाची इच्छा उत्पन्न होऊ नये म्हणून तिने सत्कारसमारंभास जायचे नाही. ती जणू अशुभ !. तिचे पांढरे कपाळ कसे पहावयाचे ? ती सर्वांची सेवा करी नि सर्वांचे शिव्याशाप घेई. पुढे वृद्धपणी तिला कोणी मान दिला तर दिला. प्रतिष्ठित वर्गात तरी असा प्रकार सुरु झाला. गरीब, श्रमणार्‍या जातीत मोकळेपणा असे. त्यांच्यात पुनर्विवाह असे. परंतु ज्या जाती स्वतःला श्रेष्ठ मानीत, त्यांच्यांत स्त्रियांची अधिक कुचंबणा.

याच सुमारास इस्लामही इकडे आला. इस्लामी धर्माच्या आक्रमणामुळे म्हणा किंवा त्यांच्यात पडद्याची चाल असे म्हणून म्हणा, उत्तर हिंदुस्थानात पडदा आला. खानदानी घराण्यातील स्त्रिया मोकळेपणी जात-येतनाशा झाल्या. मेण्यातून जायच्यायायच्या. घरी कधी इतरांना त्यांचे दर्शन व्हायचे नाही. “ज्यांच्या पायांचे नख सूर्याला कधी दिसले नाही, असे गौरवाचे वर्णन करण्यात येऊ लागले. उत्तर हिंदुस्थानभर ही पडद्याची चाल आली. राजपुतांत प्रथमपासूनच होती की मुसलमानांमुळे आली ? रजपूत स्त्रिया शूर म्हणून प्रसिद्ध. मोठमोठ्या घराण्यांतील स्त्रिया घोड्यावर बसायला शिकत. तलवार चालवायला शिकत. परंतु संकटकाळी त्या लढाईला नसत बाहेर पडत. त्या जोहार करीत. शेकडो स्त्रिया आगीत उड्या घेत. पुरुष रणांगणी धारातीर्थी पडत. रजपुतांत चालच होती की, मुलगा जन्मला म्हणजे त्याला तरवार दाखवायची, मुलगी जन्मली म्हणजे तिला दिवा दाखवायचा. पुरुषाने तरवार हाती घेऊन मरावे, स्त्रीने आगीत जळावे, हा त्या प्रतिकांचा अर्थ.”

उत्तर हिंदूस्थानात मध्ययुगात किंवा नंतर, कोणी प्रसिद्ध स्त्रिया आढळत नाहीत. मुसलमानी अमदानीत रेझिया व नूरजहान व चांदबीबी हीच नावे येतात. रेझिया दरबारात बसे, राज्य चालवी. ती जणू बंडखोर होती. मुसलमानी धर्म काही स्त्रियांना पडद्यात बसा नाही सांगत. काबाला प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी तोंडावर जरा पडदा ओढून घ्यावा, एवढेच पैगंबरांचे सांगणे.

 

पुढे जाण्यासाठी .......