बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

शबरी

तो काळ आर्यांच्या विजयाचा व विस्ताराचा होता. आर्य प्रथम पंजाबांत आले; तेथे नीट पाय रोवून ते आणखी पुढे सरकले. गंगा व यमुना या सुंदर व विशाल नद्यांच्या गहि-या पाण्याने समृध्द व सुपीक झालेल्या रमणीय प्रदेशांत आर्य राज्यें करून राहूं लागले. सृष्टिसुंदरीने वरदहस्त ठेवलेल्या याच प्रदेशांत, जनकासारखे राजर्षि जन्मले. धर्म, तत्त्वज्ञान, कला यांचा विकास येथेच प्रथम झाला, व संस्कृतिसूर्याचे हे येथील किरण हळूहळू अखिल भारतवर्षावर पसरूं लागले.

उत्तर हिंदुस्थानांत आर्यांच्या वसाहती सर्वत्र होण्यापूर्वीच ओढया प्रांतांतून समुद्रकिना-यापर्यंत येऊन तेथे गलबतांत बसून कांही धाडसी आर्य खाली सिलोन ऊर्फ लंका बेटांत गेले. या बेटाजवळ मोत्यांच्या खाणी होत्या, सोन्याच्या खाणी होत्या. हें राज्य समृध्द झालें. लंकाधीश रावणासारखा महत्त्वाकांक्षी राजा उत्तरेकडे दिग्विजय करण्यास निघाला व नाशिकपर्यंत आला. तेथे त्याने आपले अधिकारी ठेविले. रावणासारखे राजें दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होते, तर दुसरे संस्कृतिप्रसार करणारे धाडसी ऋषि विंध्यपर्वत ओलांडून खाली दक्षिणेकडे येत होते.

दंतकथांमधून इतिहास निर्मावा लागतो. अगस्ति हा विंध्यपर्वत ओलांडून दक्षिणेकडे आलेला पहिला संस्कृतिप्रसारक होय; ही गोष्ट त्याने विंध्यपर्वतास वाढूं नकोस, असें सांगितलें त्यांत दिसून येते. अगस्तीने फार प्रवास केलेला असावा. तीन आचमनें करून त्याने सात समुद्र प्राशन केले, यांतील अर्थ हा असेल की, तीन पर्यटनांत तो सात समुद्र ओलांडून आला. दंडकारण्यांत प्रवेश करणारा पहिला ऋषि अगस्तिच होय. त्याच्या पाठोपाठ भारद्वाज, मतंग, अत्रि प्रभृति ऋषि येऊं लागले व आपआपले आश्रम रमणीय अशा ठिकाणीं स्थापूं लागले. चित्रकूट हें पर्वताचें नांवच त्या पर्वताची सुंदरता पटवून देतें; तेथे भारद्वाज ऋषि राहिले. ज्याप्रमाणे ख्रिस्ती मिशनरी रानटी लोकांत जाऊन तेथे आपले बंगले बांधतात व त्यांना आपल्या धर्माची दीक्षा देतात, त्याप्रमाणे आमचे हे प्राचीन आर्यधर्मप्रचारक रानटी लोकांत जाऊंन, आश्रम स्थापून, त्यांना संस्कृतिज्ञान देऊं लागले.

हळूहळू या वैराग्यशील, ध्यानधारणासंपन्न, निष्पाप अशा ऋषींच्या साध्या राहणीचा व सुंदर आचरणाचा परिणाम या दंडकारण्यांतील कातकरी, भिल्ल, कोळी इत्यादि लोकांवर होऊं लागला. या लोकांचा व ऋषींचा संबंध येऊं लागला. भिल्ल वगैरे जातींचीं लहान लहान राज्यें होती. हे राजे आपलीं मुलेंबाळें या ऋषींच्या आश्रमांत शिकण्यासाठी कधीकधी ठेवीत. प्रेमाने व निर्लोभतेने येथील लोकांचीं हृदयें वश करून घेऊन सुंदर ज्ञान व पवित्र आचार हे ऋषि त्यांस शिकवूं लागले. रानटी लोकांच्या हृदयमंदिरांत ज्ञानाचा दिवा प्रकाशूं लागला.

अशाच थोर ऋषींपैकी मतंग ऋषि हे एक होते. पंपासरोवराच्या जवळ त्यांचा आश्रम होता. आजूबाजूला रमणीय व विशाल वनराजि होती. मतंग ऋषींची पत्नी ही अत्यंत साध्वी व पतिपरायण होती. आश्रमाच्या आसमंतातचें वातावरण अतिशय प्रसन्न व पावन असें ती ठेवीत असे. आश्रमांत हरिणमयूरादि सुंदर पशुपक्षी पाळलेले होते. सकाळच्या वेळीं पाखरांना अंगणांत नीवार धान्य टाकतांना व हरिणांना हिरवा चारा घालतांना ऋषिपत्नीस मोठा आनंद होत असे; कारण तींच तिचीं लडिवाळ मुलेंबाळें होतीं.

 

पुढे जाण्यासाठी .......

शबरी