गुरुवार, जुन 20, 2019
   
Text Size

शबरी

ऋषिपत्नी म्हणाली, 'राजा, निश्चिंत ऐस. ही माझीच मुलगी मी समजत्यें. मी तिला मजजवळ घेऊन निजेन, तिची वेणीफणी करीन. ती येथील हरिणांमोरांबरोबर खेळेलखिदळेल व त्यांच्याजवळ शिकेल. कांही काळजी करूं नको बरं !'

राजाने मुलीसाठी तांबडया रंगाचीं वल्कलें केली होतीं, तीं तिला दिलीं. मुलीला पोटाशीं धरून नंतर राजा निघून गेला.
शबरी आश्रमांत वाढूं लागली. ऋषिपत्नी तिचें कितीतरी कोडकौतुक करी. आश्रमांत गाई होत्या. गाईंच्या वासरांबरोबर शबरी खेळे, उडया मारी. तिने गाईंना नदीवर न्यावें, त्यांस पाणी पाजावें. गाईचें धारोष्ण दूध शबरीला फार आवडे. प्राचीनकालीन आर्यांचें गाय हेंच धन असे. 'गोधन' हा शब्द प्रसिध्द आहे.

शबरी सकाळीं लौकर उठे. ऋषिपत्नीने तिचे दात आधी नीट घासावे, मग तिची वेणीफणी करावी. शबरीचे केस नीट विंचरून कोणीहि आजपर्यंत बांधले नव्हते. ऋषिपत्नी शबरीच्या केसांत सुंदर फुलें घाली. शबरी म्हणजे रानची राणीच शोभे. मग शबरीने स्नान करावें, देवपूजेसाठी सुरेख फुलें गोळा करून आणावीं. दूर्वांकुरांनी गुंफून तिने हार करावे व आश्रमाच्या दारांवर त्यांची तोरणें करून लावावीं.

ऋषींची पूजावगैरे झाली म्हणजे शबरीला जवळ घेऊन ते तिला सुंदर स्तोत्रें शिकवीत, सूर्याच्या उपासनेचे मंत्र अर्थांसह तिला म्हणावयास सांगत. उषादेवीची सुंदर गाणीं ते तिजकडून म्हणवीत. उषादेवीचें एक गाणें मतंग ऋषींना फार आवडे. त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे होता-

"ती पाहा, अमृतत्वाची जणू काय ध्वजाच, अमर जीवनाची जणू पताकाच अशी उषा येत आहे. ही उषा लौकर उठणा-याला संपत्ति देते. ही आकाशदेवतेची मुलगी आहे. सुंदर दंवबिंदूंचे हार घालून आपल्या झगझगीत रथांत बसून ती येते. ती आपल्या भक्तांना कांही उणें पडूं देत नाही. ही उषादेवी किती सुंदर, पवित्र व धन्यतम अशी आहे!'

अशा प्रकारच्या गोड कविता शबरीला मतंग ऋषि शिकवीत असत. ऋषींच्या तोंडून त्या सुंदर कवितांचें विवरण ऐकतांना लहानग्या शबरीचेंहि हृदय भरून येई.

एक दिवस रात्रीची वेळ झाली होती. मतंग ऋषींची सायंसंध्या केव्हाच आटपली होती. गाईगुरे बांधली होतीं. हरिणपाडसें शिंगें अंगांत खुपसून निजलीं होतीं. ऋषि व त्यांची पत्नी बाहेर अंगणांत बसलीं होतीं. फलाहार झाला होता. नभोमंडलांत दंडकारण्याची शोभा पाहण्यासाठी एकेक तारका येत होती.

शबरी आकाशाकडे पाहून म्हणाली, 'तात, हे तारे कोठून येतात ? काय करतात ? रोजरोज आकाशांत येण्याचा व थंडीत कुडकुडण्याचा त्यांना त्रास नसेल का होत ?

 

पुढे जाण्यासाठी .......

शबरी