गुरुवार, जुलै 02, 2020
   
Text Size

शबरी

शबरीला हुंदका आला व तो तिला आवरेना. ती स्फुंदस्फुंदू लागली. पुनरपि धीर करून सद्गदित स्वराने ती म्हणाली, 'तात, असे कठोर नका होऊं. मला मग आजपर्यंत शिकविलेंत तरी कशासाठी ? सत्य, दया, अहिंसा, परोपकार, प्रेम इत्यादि गुण आपण शिकविलेत. मी घरी गेलें तर माझ्या विवाहासाठी शेकडो मुक्या प्राण्यांचा संहार होणार ! तीं मेंढरें कशीं तडफडत होती ! तात, भिल्लांचे जीवन हिंसामय आहे. मला मिळेल तो पति व सारी सासरची मंडळी हिंसामय जीवनांत आनंद मानणार- तेथे मी कशी सुखाने राहूं ? मला इकडे आड, तिकडे विहीर असें झालें आहे. 'बाप खाऊं घालीना, आई भीक मागूं देईना' अशी स्थिती माझी झाली. गंगा आस-यासाठी समुद्राकडे गेली व समुद्राने तिला झिडकारलें, तर तिने जावें कोठे ? नदी जलचरांवर रागावली, तर त्यांनी कोठे जावें ? महाराज, माझ्याबद्दल आपल्या मनांत संशय येऊं देऊं नका. मी तरूण असलें, तरी आपल्या पवित्र सान्निध्यांत असल्यावर माझें पाऊल वेडेंवाकडे पडणार नाही. आपलें संरक्षण असलें, आपली कृपादृष्टि असली, आपला आशीर्वाद असला, म्हणजे माझ्याकडे वाकडया नजरेने पाहण्याची कोणाची दुष्टाची छाती नाही. मला नाही म्हणूं नका. मी तुमची मुलगी. तुम्ही वाढविलीत, तुम्ही पदरांत घ्या. नका पायाने लोटूं तात, कृपा करा. आई, कृपा कर !'

ते करूण रसाने थबथबलेले शब्द ऐकून ऋषींचें दयामय अंत:करण वितळलें. ऋषि शबरीला म्हणाले, 'मुली, तूं मनाने फार थोर झाली आहेस. रहा, माझ्या आश्रमांत तूं राहा.'

शबरीच्या अंगावर एकदम मूठभर मांस चढल्यासारखें झालें. रडणारे डोळे हसूं लागले, प्रेममय व शांत झाले. लगेच शबरी घरच्याप्रमाणे वागूं लागली, कामधाम करूं लागली, पंपा सरोवराचें पाणी भरून घट आणूं लागली. शबरीच्या जीवनांत पावित्र्य, समाधान, आनंद, सरलता यांचे झरे वाहूं लागले.

शबरीचा पिता आला; परंतु मतंग ऋषींनी त्याला सर्व समजावून सांगितलें. पिता न संतापतां पुनरपि माघारा गेला. शबरीचें जीवन संथपणें वाहूं लागले.

शबरी आता तपस्विनी झाली, योगिनी झाली. तिच्या चर्येत, चालचलणुकीत पंपासरोवराची गंभीरता व पवित्रता होती. तेथील वनराजीची भव्यता व स्निग्धता, सुरभिता व सौम्यता तिच्या हृदयांत होती. मतंग ऋषींजवळ सुखसंवाद करण्यांत तिचे दिवस आनंदाने निघून जात.

एक दिवस मतंग ऋषि म्हणाले, 'शबरी, परमेश्वर जरी सर्व चराचरांत भरून राहिला असला, तरी कांही वस्तूंत परमेश्वराचें वैभव जास्त स्पष्टपणें प्रतीत होतें व आपलें मन तेथे विनम्र होतें. उदाहरणार्थ, हा वटवृक्ष पहा. सर्व वृक्ष-वनस्पतींत ईश्वरी अंश भरलेला आहेच; परंतु गगनाला आपल्या फांद्यांनी उचलून धरणारा, आजूबाजूस आपले प्रेमळ पल्लवित हात पसरून विश्वाला कवटाळूं पाहणारा, हजारो पाखरांस आश्रय देणारा, पांथस्थांस शीतल व घनदाट छाया वितरणारा हा वटवृक्ष पाहिला, म्हणजे याच्या ठिकाणी असलेलें परमेश्वरी वैभव जास्त स्पष्टपणें प्रकट झालेलें दिसतें आणि आपलें मन वटवृक्षाबद्दल भक्तिभावाने भरून येतें, आपण त्याची पूजा करतों. शबरी, सर्व प्रवाहांचे ठिकाणीं परमेश्वर आहेच; परंतु हजारो कोस जमीन सुपीक करणारी, शेकडो शहरांना वाढवून त्यांना वैभवाने नटविणारी एखादी मोठी नदी, तिला आपण अधिक पवित्र मानतों.

 

पुढे जाण्यासाठी .......

शबरी