गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

शिरीषचे प्रयाण

शिरीष करुणेची समजूत घालीत होता. परंतु तिचे अश्रु थांबत ना.

‘करुणे, किती रडशील! जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पुढे मी तुला नेईन. सुखी करीन.’

‘पुढे काय होईल, कोणास माहीत? मोठ्या शहरात मोह असतात. शिरीष, मी खेडवळ. मी तुला मग आवडणार नाही. मुख्य प्रधानाची बायको मी शोभणार नाही. माझ्यामुळे तुला कमीपणा येईल. मला न्यायची तुला लाज वाटेल.’

‘माझ्यावर तुझा विश्वास नाही का? तुझे प्रेम का मी विसरेन ? तुझे प्रेम बळकट असेल तर ते मला ओढून आणील. ते आपली ताटातूट करणार नाही. उगी. आता उजाडेल. चल, आपण बागेत जरा फिरु.’

दोघे बागेत गेली. एक सुगंधी फूल तोडून करुणेने शिरीषला दिले आणि शिरीषने एक फूल तो़डून तिच्या केसांत खोवले. इतक्यात मित्र प्रेमानंद आला.

‘ये; प्रेमा, ये.’ शिरीष म्हणाला.

‘शिरीषला नका हो जाऊ देऊ. तुम्ही त्याचे मित्र. शिरीष माझे ऐकत नाही; परंतु तुमचे ऐकेल. सांगा त्याला.’ करुणा केविलवाणे म्हणाली.

‘पत्नीपेक्षा का मित्राचे प्रेम अधिक असते ?’ प्रेमानंद हसून म्हणाला.

‘हो. मित्र सर्वांहून जवळचा.’ ती म्हणाली.

‘करुणे, तू खुळी आहेस.’ शिरीष म्हणाला.

‘खुळ्या बायकोला तू कशाला उद्या नेशील ? खरे ना हो प्रेमानंद ? प्रधान झाल्यावर शिरीष मला नेईल का ?’

‘नेईल. त्याने न नेले तर तुम्ही जा.’

‘त्याने घालवले तर ?’

‘राजाजवळ दाद मागा.’

‘पतिपत्नीची ताटातूट करणारा राजा न्याय थोड़ाच देईल ?’

‘करुणे, राजा यशोधर थोर आहे. पुण्यश्लोक राजाला नावे नको ठेवूस.’

‘प्रेमानंद, मी आता जाईन. माझ्या वृद्ध आईबापांची काळजी घे. करुणा आहेच. ती त्यांचा सांभाळ करील; परंतु तुझेही लक्ष असू दे. तुम्ही दोघे आहांत, म्हणून मला चिंता नाही. करुणे, त्या उगवत्या सूर्यनारायणास साक्षी ठेवून शपथ घे, सासूसास-यांची मी सेवा करीन.’

 

पुढे जाण्यासाठी .......