गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

दुःखी करुणा

शिरीष गेल्यावर करुणा हसली नाही. तिचा चेहरा उदास असे, गंभीर असे, ती घरचे सारे काम करी. सासूसार-यांची सेवा करी. रात्री अंथरुणावर पडली म्हणजे मात्र तिला रडू आल्याशिवाय राहात नसे. करुणा एकटी मळ्यात काम करी;  परंतु तिच्याने कितीसे काम होणार ? पूर्वी दोघे होती, तेव्हा मळा चांगला पिके. आता पीक येत नसे. मजुरीने माणसे लावायला पैसे नसत. घरी ना नांगर ना बैल ! कोणाचा बैल, कोणाचा नांगर मागावा ? कसे तरी करुन करुणा गाडी हाकीत होती.

परंतु हळुहळू कर्ज झाले. मळा गहाण पडला. शेवटी तो सावकरांच्या घशात गेला. आता कोठली बाग, कोठली फुले ? करुणा आता दुस-याकडे मोलमजूरी करी. कोणाच्या शेतात खपे. कोणाच्या घरी दळणकांडण, कोणाची धुणी करी आणि सासूसास-यांचे पोषण करी.

करुणेच्या जवळ आता काही नव्हते. सोन्याचांदीचा दागदागिना नव्हता, अंगावर फुटका मणीसुद्धा नव्हता. तिच्या नेसूच्या चिंध्या असत. गरीब बिचारी ! परंतु स्वतःचे दुःख उगाळीत बसायला तिला वेळ नसे. तिच्यावर जबाबदारी होती. पतीने सूर्यनारायणाची साक्ष घ्यायला लावली होती. सासूसास-यांचे पालन तिला करायचे होते. ती दिवसभर राब राब राबे. कधी रानात जाई व मोळी घेऊन येई. कधी रानात जाई व करवंदे विकायला आणी. किती कष्ट करी !

परंतु कष्टांचे चीज होत नव्हते. सासूसासरे तिच्यावर रागावत. हीच पांढ-या पायाची अवदसा आहे, असे ती म्हणत. एके दिवशी नित्याप्रमाणे करुणा रात्री सासूबाईंचे पाय चेपीत होती. सासू एकदम ओरडली, ‘नको चेपू पाय. तुझे हात लावू नकोस. तू माझा’ मुलगा दवडलास. तू तुझे आईबाप लहानपणी खाल्लेस आणि आम्हाला छळायला आलीस. तुला मुलबाळही होईना. वांझोटी, म्हणून गेला माझा बाळ. वैतागून गेला. हो चालती, कर तोंड काळे, सेवा करण्याचे सोंग करते सटवी. रानात जाते मोळी आणायला. रानात चोरुन खात असशील, कोणाला मिठ्या मारीत असशील, नीघ. रडते आहे. झाले काय रडायला ? सोंगे करता येतात.’

सावित्रीसासू वाटेल ते बोलली. करुणा अश्रू ढाळीत होती. ती पुन्हा पाय चेपू लागली. तो वृद्ध सासूने लाथ मारली. अरेरे !

करुणेचे आचरण धुतल्या तांदुळासारखे होते. तरीही सासू नाही नाही ते बोलत असे. इतर सारी बोलणी करुणा सहन करी; परंतु पतिव्रत्यावर, सतीवर टीका तिला खपत नसे. त्या रात्री तिला झोप आली नाही.

एके दिवशी ती प्रेमानंदकडे गेली. म्हणाली,

 

पुढे जाण्यासाठी .......