गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

सासूसासर्‍यांची समाधी

दुष्काळ संपला. देवाला करुणा आली. आकाश भरभरुन आले. पाऊस मुसळधार पडला. तहानेलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली. नद्या नाले भरले. वापी तडाग भरले. लोकांची हृदयेही आनंदाने भरली.

राजा यशोधराने दुस-या देशांतून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी-बीयाणे पुरविले. पृथ्वी हिरवी दिसू लागली. शेतकरी शेतात दिसू लागली. लवकर येणारे धान्य पेरले गेले. बाजरी, मकई बरीच पेरली गेली.

सुबत्ता आली. धान्य पिकले. करुणा सासूसास-यांस आता पोटभर जेवण वाढी. त्यांचे पाय चेपी. तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या. एक मामंजींच्या खाली तिने घातली, एक सासूबाईंच्या. ती म्हाता-यांची दाई बनली, आई बनली.

परंतु ती पिकली पाने गळणार असे आता दिसू लागले. सासूबाई एके दिवशी अंग धुवून येत होत्या. तो त्या धपकन् पडल्या. करुणा त्या वेळेस घरात नव्हती. सास-यानेच उठून सावित्रीबाईंस घरात आणले, परंतु सावित्रीबाईंस शुद्ध येईना.

दुपारी करुणा घरी आली, तो हा प्रकार. ती धावत प्रेमानंदाकडे गेली. प्रेमानंद कसलीतरी मुळी घेऊन आला. एक मात्रा घेऊन आला; परंतु कशाचा उपयोग नव्हता. सासूबाई देवाघरी निघून गेल्या होत्या.

आता वृद्ध सुखदेव राहिले. तेही जणू आपली वाट पाहात होते.

‘ती गेली. आता मलाही बोलावणे येईल. करुणे, तू जा. तुला देव आहे. शिरीष तुला भेटल. निराश नको होऊ. मरणोन्मुख माणसाचा मनापासून दिलेला आशिर्वाद खोटा नाही होणार.’ ते करुणेला म्हणत.

एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले. जरा छातीत कळ आली आणि सारे खलास.

सासूसासरे, दोघे गेली. करुणा एकटी राहिली. ती कर्तव्यातून मुक्त झाली होती. जी शपथ तिने घेतली होती, ती तिने अक्षरशः पाळली होती; परंतु अद्याप एक कर्तव्य राहीले होते. शेवटचे कर्तव्य.

त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधायची प्रथा होती. राजे-महाराजे प्रचंड समाध्या बांधीत. गोरगरीब चार दगड तरी उभारीत. जेथे मृतांना जाळले, पुरले, त्या जागेवर पाप पडू नयेत म्हणून ही व्यवस्था! गावोगाव अशा लहानमोठ्या समाध्या दिसत असत. चबुतरे दिसत असत. कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या.

 

पुढे जाण्यासाठी .......