बुधवार, जुन 03, 2020
   
Text Size

सासूसासर्‍यांची समाधी

परंतु करुणा कशी बांधणार समाध्या? ती गरीब होती. राहाते घरही गहाण होती. कोठून मिळणार कर्ज? मोलमजुरीतून कितीसे उरणार? ते किती पुरणार? अश्रूंची बांधता आली असती, तर अमर समाधी तिने बांधली असती. मोत्यांसारखे अश्रू; परंतु त्यांची कशी बांधणार समाधी? अश्रूंची आरसपानी समाधी हृदयांगणात बांधता येईल ; परंतु जगाच्या अंगणात दगडाधोंड्यांचीच समाधी हवी.

करुणेने निश्चय केला. दगडधोड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला. दिवसभर ती पोटासाठी काम करी; परंतु रात्री ती मोकळी असे. ती रात्री उठे. जंगलातून, रानातून हिंडे. सुरेख दगड गोळा करीत हिंडे. गुळगुळीत चपटे दगड. तिला भीती वाटत नसे. अस्वलालांडग्यांची, तरसावाघांची तिला भीती वाटत नसे. भुताखेतांची, खवीससमंधाची तिला भिती वाटत नसे.

एखादा सुरेखसा दगड सापडला की, तिला आनंद होई. कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगड वेचीत हिंडे. थकून भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे. चंद्र तिच्यावर अमृतमय किरणांची वृष्टी करी. वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूचे पाणी लावून तिला उठवी. पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई.

दगड बरेच जमा झाले. दोन लहानसे चबुतरे आता बांधता येतील, असे करुणेला वाटले. तिने एके दिवशी माती खणली. गारा तयार करण्यात आला. तिने माती तुडविली. मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता. गारा पक्का होऊ दे.

आज रात्री समाध्या बांधण्याचा आरंभ ती करणार होती. दोन्ही समाध्यांचा एकदम आरंभ. ती एक दगड सास-यांच्या समाधीसाठी लावी. दुसरा सासूच्या. दोन्ही समाध्या एकदम  पु-या झाल्या पाहिजेत. तोंडाने गाणे म्हणत होती. तन्मय झाली होती.

एका रात्रीत ते काम थोडेच पुर्ण होणार! दोनतीन रात्री गेल्या. अद्याप समाध्या अपु-या होत्या. दगड कमी पडणार वाटते?

त्या रात्री करुणा सारखे बांधकाम करीत होती. दगड संपले. आज काम पुरे करायचे असे तिने ठरविले होते. ती दगड धुंडीत निघाली. सापडला की ती आणीत होती; परंतु थकली. त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी येऊन पडली! कर्तव्यपरायण करुणा!

ती गाढ झोपेत होती की, बेशुद्ध अवस्थेत होती! बेशु्द्ध नाही. झोप आहे. श्वास चालला आहे. झोप हो, करुणे! भूमातेच्या मांडीवर जरा झोप. धरित्रीआई तुझे काम पुरे करील. ती धावून येईल.

 

पुढे जाण्यासाठी .......