शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

सासूसासर्‍यांची समाधी

आणि खरेच धरित्रीमाता आली. मुलीच्या मदतीला आली. सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्रीमाता आली. करुणेच्या स्वप्नात धरित्रीमाता आली व म्हणाली, ‘मुली, थकलीस हो तू. धन्य आहेस तू. तूझ्यासारखी कर्तव्यपरायण मुलगी मी पाहिली नाही. आजपर्यंत किती श्रमलीस, कष्टलीस. झोप हो तू. तुझ्या समाध्या मी पु-या करविते. मी नागोबा व वाघोबा ह्यांना सांगते की, जा रे त्या समाध्या नीट बांधा. सुंदर बांधा. करुणे, तू सकाळी उठशील तेव्हा समाध्या बांधलेल्या असतील. चिंता नको करु. झोप, माझ्या मांडीवर झोप.’

आणि खरेच नागोबा व वाघोबा आले. त्या दोन्ही समाध्या ते बांधू लागले. वाघाने दग़डांवर अंग घासून  ते आरशासारखे गुळगुळीत केले. नागोबा लांब होई व मोजमाप करी, अंगाचा गुण्या करी.

‘नागोबा, कशा आकाराच्या बांधाव्या रे?’

‘वाघोबा, कमळाकृती बांधाव्या. अष्टपत्री बांधाव्या. जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे.’

मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले. त्या समाध्यांची वृक्षवेलींनी पूजा केली. वा-याने स्तुतिस्तोत्रे म्हटली. त्या समाध्यांची निसर्गाने पहिली पूजा केली.

उजाडले. दिशा फाकल्या, सूर्याचे प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली. जणू प्रेमळ पित्याने जागे केले. करुणा उठली. जणू स्वप्नसृष्टीतून उठली. तिचे हृदय आनंदाने, सुखाने भरुन आले होते. जणू ती माहेरुन आली होती. आईचा हात अंगावरुन फिरुन आली होती.

ती समोर पाहू लागली. तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या! आजूबाजूस इवलीही घाण नाही. दगडधोंडा उरलेला नाही. मातीचा गारा पडलेला नाही. सारे स्वच्छ व सुंदर, ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहात होती. खरेच का भूमातेने ह्या पु-या केल्या? तिने त्या समाध्यांस हात लावला. तो त्या ख-या होत्या. स्वप्न नाही. भ्रम नाही.

तिने त्या समाध्यांना प्रदक्षिणा घातल्या, आणखी रानफुले घेऊन आली. पिवळी, निळी, पांढरी फुले, वेलीच्या दोरात ती फुले गुंफून तिने माळा केल्या. त्या समाध्यांवर तिने त्या रमणीय माळा घातल्या. तिने भक्तिमय प्रणाम केला आणि ती निघाली.

तिचे हृदय कृतज्ञतेने भरुन आले होते. तिचे जीवन आनंदाने ओसंडत होते. कोणाला सांगू हा आनंद? कोणाला दाखवू? हा आनंद मी एकटी कशी भोगू? शिरीष, कोठे आहेस तू? ये, ये. तुझा हात धरुन तुला तिकडे नेते; परंतु शिरीष लांब लांब, शेकडो कोस दूर होता.

 

पुढे जाण्यासाठी .......