बुधवार, जुन 03, 2020
   
Text Size

सासूसासर्‍यांची समाधी

करुणेला आता काही कमी पडत नसे. सावकाराने तिचे घर तिला दिले, मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला. कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत. कोणी अलंकार अर्पीत. कोणी बायका आपली मुले आणीत व तिच्या पायांवर घालीत. करुणा अंबरगावची जणू देवता बनली.

परंतु देवता दुःखीच होती. देवतेचा देव कोठे होता ? शिरीष ! कोठे आहे शिरीष ? जुन्या बागेतील शिरीषवृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे, ‘फुलांनो, सांगा रे शिरीष कोठे आहे तो. तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे. प्रेमळ व कोमल आहे. परंतु आज तो दगडासारखा झाला, लोखंडासारखा झाला ! शिरीष, ने रे मला. तू म्हणाला होतास की, तुझे प्रेम मला खेचून आणील. का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणीत नाही ? माझे प्रेम कमी का पडते ? शिरीषच्या फुलांनो, तुम्ही मला प्रिय आहात. कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे. त्याने माझ्या केसांत शिरीष फुलच जाताना खोवले होते.’

एके दिवशी रात्री करुणा एकटीच त्या समाध्यांजवळ बसली होती. विचारात रंगली होती. तिने शेवटी त्या समाध्यांना प्रार्थना केलीः

‘पवित्र आत्म्यांनो, प्रेमळ आत्म्यांनो! मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल, कधी कंटाळल्ये नसेन, कर्तव्यात टंगळमंगळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटवा. शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की, जा, करुणा रडत आहे. तिला जाऊन भेट. पवित्र आत्म्यांनो, ह्या मुलींची ही प्रार्थना पुरी करा.’

समाध्यांना फुले वाहून ती घरी आली. ती अंथरुणावर पडली. शांत झोपली. जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल ह्या विश्वासाने ती झोपली होती. आज तिला लवकर जाग आली नाही. कितीतरी दिवसांत अशी शांत झोप तिला लागली नव्हती आणि पहाटे तिला स्वप्न पडले. सासूसासरे शिरीषला हाताला धरून आणीत आहेत, असे तिने पाहिले. ती लाजली आणि स्वप्न भंगले. प्रेमात रंगलेले स्वप्न भंगले; परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात ?

 

पुढे जाण्यासाठी .......