मंगळवार, आँगस्ट 11, 2020
   
Text Size

भूत बंगला

'ती खोली. मी बाहेर जाते जरा. तुम्ही जा आत.' असे म्हणून ती हिरी गेली.

वालजीने दार उघडले. घोंगडया पांघरून नवराबायको बसली होती. काळोखात कोपर्‍यात ते बुरखेवाले होते.

'या, बसा खुर्चीवर.' नवरा कण्हत म्हणाला.

'सारखी दोघं आजारी आहोत. पांघरायला नाही. ही भटटी ठेवली आहे पेटवून. पोरं भीक मागायला गेली आहेत. आणतील तुकडे तेव्हा शिळंपाकं खायचं.' बायको रडत म्हणाली.

'ते दार घ्या लावून. वारा नाही सहन होत.' नवरा म्हणाला. वालजीने दार लावले.

'ते उघडेल वार्‍यानं. कडी लावा!' बायको म्हणाली. वालजीने कडी लावली. तो खुर्चीवर बसला. तो खिडकीतून बघत होता. इतक्यात ते चारी बुरखेवाले उठले. त्यांनी त्याच्या तोंडात बोळे घातले. भराभरा त्यांनी त्याला दोरखंडाने आवळले. खुर्चीला बांधले. ती नवराबायकोही त्या कामात सामील झाली.

झरोक्यातून तरुण दिलीप पाहात होतो. त्याने पिस्तुल धरून ठेवले होते. ते पिस्तुल मारावयाचे धैर्य त्याला झाले असते का? पित्याचे प्राण वाचवणार्‍यावर का गोळी झाडायची? त्याच्या मनात काहूर माजले होते. तो पाहात होता तो भेसूर प्रकार!
भटटीतील निखारे फुंकले गेले. त्या निखार्‍यांचा लाल प्रकाश खोलीत पसरला. दिवा तर मिणमिण करीत होता. भटटीत सांडस होता. तो लाललाल झाला होता.

'तुम्ही ओळखलंत का मला? तो खाणावळवाला मी. लिलीला छळणारा तो मी. जरा नीट बघा माझ्याकडे. पटली ओळख? रानात मला दरडावलंत, लाल डोळयांनी पाहिलंत. त्या लाल डोळयांत आता हा लाल सांडस जाणार आहे. मी शब्दांनी बोलत नसतो. कृतीनं! मी डाकू आहे. खुनी आहे. सूड घेतो आज; परंतु आधी त्या मुलीचा पत्ता सांग. ती कुठं आहे ते सांग.'

तो लाल सांडस हातात घेऊन खाणावळवाला खुर्चीसमोर उभा राहिला.

'बोल, तिचा पत्ता सांग.' तोंडातील बोळा थोडा वेळ काढण्यात आला.

 

पुढे जाण्यासाठी .......