गुरुवार, आँगस्ट 13, 2020
   
Text Size

भूत बंगला

वालजीने पत्ता सांगितला. खाणावळवाला बाहेर गेला व त्याने शीळ घातली. एकदम हिरी आली. त्याने हिरीला त्या पत्त्यावर जाऊन तेथे ती मुलगी आहे का बघ म्हणून सांगितले. तो पुन्हा खोलीत आला; परंतु दार लावायचे राहिले, - म्हणजे कडी लावायची राहिली. पुन्हा बोळे घातले गेले.

'तुझ्या त्या लिलीचे हालहाल करीन. रोज चाबकांनी फोडीन तिला. तिला ठार नाही मारणार. तिला जिवंत ठेवीन. हाल करण्यासाठी जिवंत ठेवीन. तुझे तर तुकडे करायचे आहेत. हे पाहा चार दोस्त आहेत. ते तुझी खांडोळी करतील. मी लाल सांडसानं डोळे भाजीन, तुझी लांब जीभ भाजीन.'

खाणावळवाला जरा थांबला. खोलीत भीषण शांतता होती. वालजी हलू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. तो सिंह अडकून पडला होता, परंतु त्याच्या डोळयांत निर्भयता होती.

दाराशी हिरी आली. बाप बाहेर गेला. 'त्या पत्त्यावर लिली भेटली नाही. त्या पत्त्यावर कुणी राहात नाही.' असे तिने सांगितले. ती निघून गेली. बाप संतापाने घरात आला.

'हरामखोरा, फसवतोस काय? बोल, लिली कुठं आहे? बोल.' त्याच्या तोंडातील बोळा काढून खाणावळवाल्याने विचारले.
'अरे जा रे माकडा! ती लिली का तुझ्या हाती मी लागू देईन? माझे तिळाएवढे तुकडे केलेत तरी चालेल. लिलीचा, त्या अनाथ मुलीचा पत्ता मी सांगणार नाही. मला काय या लाल सांडसाची भीती दाखवतोस? मला भीती दाखवतोस?' असे म्हणून वालजीने दोरखंडातून हात एकदम मोकळा करून खाणावळवाल्याच्या हातातील तो लांब सांडस ओढून घेतला.

'हे बघ. या लाल सांडसानं मी माझं अंग स्वत: भाजून घेतो. बघ. हा बघ माझ्या देहावर ठेवतो. बघ.' असे म्हणून वालजीने खरोखरच तो लाल फाळ खांद्यावर ठेवला. चुर्र चुर्र झाले. चरबी जळू लागली. दिलीपला ते दृश्य बघवेना.

इतक्यात शिटया झाल्या. पोलिस आले. दार उघडून आत आले. खाणावळवाला, ते चौघे साथीदार, ती बाई, सर्वास एकदम पकडण्यात आले. पोलिस अधिकारी आत आला. तो खुर्चीवर त्याने कोणाला पाहिले?

वालजी? समुद्रात मेलेला वालजी? त्या शहराचा अध्यक्ष वालजी! 'वालजी मेला नाही एकूण? वा! तुम्हीही सापडलेत. ठीक. योगायोग तुमचा आमचा. यांच्या दोर्‍या मोकळया करा. मागं ते आपण होऊन स्वाधीन झाले होते. ते चोर असले तरी थोर आहेत.' तो पोलिस अधिकारी म्हणाला.

 

पुढे जाण्यासाठी .......