रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

समारोप

‘शिरीष, किती वर्षांनी भेटलास !’

‘परंतु तू माझ्या हृदयात होतास. जेवताना एक घास तुझ्या नावाने मी घेत असे.’

शिरीषने हेमाला मळा, बाग सारे दाखविले आणि तिघे पूजापात्रे हाती घेऊन समाध्यांच्या दर्शनार्थ गेली. शिरीषने साष्टांग नमस्कार घातला. तो रडत होता. भूमातेवर अश्रूंचा अभिषेक झाला. तो उठेना. तसाच दंडवत् पडून राहीला.

‘शिरीष, ऊठ आता. अश्रूंनी खळमळ धुवून जाते. ऊठ राजा !’ करुणा म्हणाली.

हेमाने त्याला उठविले. तिघे हात जोडून उभी होती. शिरीष म्हणाला, ‘आई, बाबा, क्षमा करा हो.’

‘क्षमा !’ आकाशवाणी झाली.

तिघे परत आली. शिरीषने गावाला मिष्टान्नाचे भोजन दिले. त्याने कोणाला ददात ठेवली नाही. कोणाला घर बांधून दिले. कोणाला जमीन दिली. कोणाचे कर्ज फेडले.

‘माझ्या जन्मभूमीत कोणी दुःखी नको!’ तो म्हणाला.

बरेच दिवस संसार करुन ती तिघे मरण पावली, देवाकडे गेली. किती तरी दिवस त्यांच्या कथा लोक सांगत असत आणि करुणेचा महिमा तर त्या प्रांतात अद्याप सांगतात. ते मुक्तापूर आज नाही. ते अंबर गाव आज नाही. त्या समाध्या आज नाहीत. तो उंच स्तंभ आज तेथे नाही. तरीही करुणादेवीची गाणी त्या प्रातांत अजून म्हटली जातात. भिकारी म्हणतात. बायामाणसे ऐकतात. मुले मुली ऐकतात.

‘आई, खरेच का ग अशी करुणादेवी झाली?’

मूले मग विचारतात.

‘तर का खोटे आहे गाणे ? खरेच हो अशी करुणादेवी झाली. तिला मनात प्रणाम करा हो!’ असे आई सांगते.

 

पुढे जाण्यासाठी .......