बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

चित्रा

बळवंतराव मामलेदार फार लोकप्रिय होते. मामलेदार म्हणजे तालुक्याचा राजा. हिंदुस्थानातील इंग्रजांचा कारभार तेच चालवीत होते असे म्हणा ना. मामलेदारावर तालुक्यातील सुखदु:ख अवलंबून असते. मामलेदार सव्यसाची असतो. त्याला मुलकी सत्ता व फौजदारी सत्ता असते. आरोप करणारा तोच, शिक्षा देणारा तोच. तालुक्यातील पीकपाणी कसे आहे याचा अहवाल तोच देणार. सारासूट द्यायला हवी की नको याची शिफारस तोच करणार. गोरगरिबांवर अन्याय होत नाहीत ना, हे तोच पाहाणार. मामलेदार मनात आणील तर तालुका सुखी करू शकेल. निदान त्याच्या हातात असते तितके जरी तो प्रामाणिकपणे करील तरी लोकांना पुष्कळसे हायसे वाटेल.

बळवंतराव हे अपवादात्मक मामलेदार होते. लाचलुचपत त्यांना माहीत नव्हती. ते पापभीरू व देवभीरू होते. इकडे देवदेवतार्चन भरपूर करावयाचे व तिकडे पैसे खावयाचे असा त्यांचा धर्म नव्हता. ते फिरतीवर गेले म्हणजे शेतकरी त्यांना भेटी देत. कोणी तूप देई, कोणी काही देई, परंतु बळवंतराव घेत नसत.

‘मला धुतल्या तांदळासारखी राहू दे. तुम्ही कदाचित प्रेमानेही देत असाल, परंतु लोक निराळा अर्थ  करतील. म्हणतील की, हा मामलेदार लाच घेतो. नकोच हे घेणे.’ असे ते म्हणावयाचे.

त्यांची नुकतीच निर्मळपूरला बदली झाली होती. सामानसुमान सारे आले. ते आधी एकटेच पुढे आले होते. मंडळी मागून आली. त्यांच्या पत्नीचे नाव सीता. सीताबाईंना एक मुलगी व तीन मुलगे होते. मुलगी सर्वांत मोठी, तिचे नाव चित्रा. चित्रा आता जवळजवळ १५-१६ वर्षांची होती. भावांची नावे श्यामू, रामू व दामू अशी होती. श्यामू बारा वर्षांचा होता. रामू दहा वर्षांचा. दामू सात वर्षांचा होता. दामूच्या पाठीवर मात्र सीताबाईंस मूल झाले नव्हते. सर्वांत लहान तो सर्वांचा लाडका होता; परंतु बळवंतरावांचे चित्रावर फार प्रेम होते. चित्रा जन्माला आली व ते मामलेदार झाले होते. इतक्या लवकर आपणास मामलेदारीचा योग आला याचे कारण चित्रा, असे ते म्हणत. चित्रा म्हणजे आपल्या कुटुंबाचे भाग्य आहे, सुदैव आहे, असे ते म्हणायचे. चित्राच्या आधी झालेली मुले मरण पावली होती; परंतु चित्रा जगली, मोठी झाली, तीच वाचली एवढेच नव्हे, तर आपल्या पाठच्या भावडांनाही तिने आयुष्य दिले, यामुळे बळवंतराव चित्राला जीव की प्राण करीत. तिचे मन ते कधी दुखवीत नसत. तिची इच्छा नेहमी पूर्ण करीत.

चित्रा आता इंग्रजी शाळेत होती. पाचवी-सहावीत होती. निर्मळपूरच्या फौजदारांची नात फातमा तिची मैत्रीण होती. फातमा तिच्यात वर्गात होती. मुसलमान मुली इंग्रजी शाळेत क्वचितच असतात, परंतु  फातमाचे आजोबा सुधारक होते. ज्ञान ही पवित्र वस्तू आहे असे ते म्हणत. बुरख्याचे थोतांड त्यांस पसंत नसे.

फातमाची आई लहानपणीच वारली होती. तिच्या बापाने पुढे दुसरे लग्न  केले. फातमा आजोळीच असे. आजोबा महंमदसाहेब फातमावर जीव की प्राण प्रेम करीत. फातमाचा बाप हसन तिला भेटायला  मधूनमधून येत असे.

एकदा एके रविवारी बळवंतराव एका खेड्यावर वनभोजनासाठी गेले होते. एका मळ्यात उतरले होते. फौजदार महंमदसाहेब व फातमा हीही आली होती. चित्रा, श्यामू व रामू हीही आली होती. सुंदर अशी बैठक आमराईत घातलेली होती. तिकडे मोट धो धो चालू होती. भाजीपाल्याचा आसपास फुलझाडेही होती. श्यामू व रामू तिकडे रंगले. रताळी उपटून ते खात होते. टमाटो मटकावीत होते.

 

पुढे जाण्यासाठी .......