शुक्रवार, जुलै 10, 2020
   
Text Size

प्रेमाचा अंकुर

'आपण तिकडे जाऊ या ताटव्याजवळ.'

'चल.'

लिली व दिलीप तेथे बसली होती. थोडया वेळाने वालजी आला. लिली पटकन उठून गेली. आता रोज लिली फिरायला येऊ लागली. वालजीच्या ती पाठीस लागे. लिली बगीच्यात प्रेम फुलवीत बसे. वालजी रस्त्यांतून हिंडे. रस्त्यांतील भिकार्‍यांस वालजी पैसे द्यायचा. रोज तो पैसे देई. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले. कोण हा माणूस? रोज कोठून आणतो पैसे? पोलिसांचे पुन्हा आपल्याकडे लक्ष आहे ही गोष्ट वालजीच्या ध्यानात आली. त्याने फिरायला येणे बंद केले. त्याने पुन्हा घरही बदलले.

दिलीप बागेत येई; परंतु लिली दिसेना. बागेत शेकडो सुंदर सुंदर सुगंधी फुले फुललेली असत; परंतु दिलीपचे लक्ष नसे. लिलीचे मुखकमल त्याच्या डोळयांसमोर असे. तो खिन्न होई, उदासपणे निघून जाई. एके दिवशी असाच तो उदासीन बसला होता, इतक्यात कोणी एक मुलगी आली.

'तुम्ही असे उदासीन का? ती बरी आहे. ती दुसरीकडे राह्ययला गेली आहे. मला आहे तिचा पत्ता माहीत. तुम्हाला दाखवू तिचं घर? माझ्याकडे बघा ना जरा. मी का इतकी वाईट आहे? तुमची खोली मी साफ करीत असे, तुमचे केस विंचरून भांग पाडीत असे. तुमच्यासाठी मी वाचायला शिकल्ये. तुम्ही का हो नाही मजवर प्रेम करीत? लिली. लिलीचं तुम्हाला वेड व मला तुमचं वेड. बरं. पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी मी पेरते. पुढच्या जन्मी सहस्त्रपट मिळो. चला, येता? मी दुरून दुरून चालेन, म्हणजे तुम्हाला लाज नको वाटायला. मी घर दाखवते. चला. असे उदास नका बसू. मी हसल्ये नाही तरी तुम्ही हसावं, आनंदात असावं असं मला वाटतं. उठा.' छबी म्हणाली. तो निघाला. ती निघाली. बर्‍याच वेळाने एक घर आले.

'त्या घरात ती राहाते. पुढच्या जन्मी द्या हो मला प्रेम आणि तुम्ही हसा. तुम्ही सुखी व्हा.' असे म्हणून ती गेली.

दिलीप तेथे उभा होता. त्या घरात कोणी दिसत नव्हते. रात्र झाली तरी त्या घरात दिवे नव्हते. दिलीपने एक चिठठी लिहिली; परंतु द्यायची कोणाला? त्याने दरवाजाजवळ दगडाखाली ती चिठठी लिहून ठेवली. तो गेला.

 

पुढे जाण्यासाठी .......