मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

प्रेमाचा अंकुर

लिलीचे हे घर एका बाजूला होते. तो बंगला होता. वालजी पहाटे उठला. तो अंगणातील बागेत हिंडत होता. दरवाजाजवळ त्याला दगड दिसला. रोज दगड नसतो. आज कोठून आला? त्याने उचलला. तोच खाली चिठठी. त्याने ती चिठठी वाचली. ती प्रेमपत्रिका होती. वालजी गंभीर झाला. त्या बागेत फिरायला जाण्याचा हटट लिली का धरी ते त्याच्या लक्षात आले. लिली प्रेमात सापडली. मग त्यात वाईट ते काय? तिने संन्यासिनी होऊ नये म्हणून ना तिला मठातून मी आणले? योग्य पतीशी तिचा विवाह करून देणे हे आता कर्तव्यच  होते.

वालजीला रडू आले. त्याच्या डोळयांतून पाणी गळू लागले. लिलीचे लग्न लागले म्हणजे मी एकटा. कोण मग मला? वालजी एकटा राहील; परंतु म्हणून का लिलीचा संसार बंद करू? माझ्या सुखासाठी? छे! तिच्या आईच्या स्वर्गस्थ आत्म्याला मी वचन दिले आहे. लिलीचे सारे मला केले पाहिजे. मी एकटा राहीन; परंतु लिलीचे लग्न झाल्यावर मला जगायला तरी कारण काय? लिलीसाठी जणू माझे प्राण आहेत. नाही तर ते कधीच जाते. समुद्रातून मी तरलो. का? तिच्यासाठी. ती एकदा संसारात पडली म्हणजे वालजीचे कृतकृत्य जीवन एकदम समाप्तही होईल! कोणी सांगावे?

 

पुढे जाण्यासाठी .......