गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

बापूजींच्या गोड गोष्टी

१२२

गांधीजी आंध्र प्रांतात दौ-यावर होते. आंध्र तलम खादीसाठी प्रसिद्ध. चिकाखोल गावी खादीप्रदर्शन होते. गांधीजी आज तेथे यायचे होते. त्या बघा आंध्र भगिनी चरख्यावर बसून कातीत आहेत. जवळच कापसाचे पेळू आहेत. एका पेळूतून तीनतीनशे तार सूत निघत आहे. पन्नास साठ नंबरचे सूत. स्वत:च्या हातच्या सुताचीच वस्त्रे त्या भगिनींनी परिधान केली होती. दुधाच्या धारेसारखे सूत निघत होते. तो अद्भुत देखावा पाहून गांधीजींचे हृदय उचंबळून आले आणि तेही चरखा घेऊन कातू लागले.

एकामागून एक भगिनी येत होत्या व गांधीजींच्या चरणाजवळ स्वच्छ सुताची गुंडी भेट म्हणून ठेवून प्रणाम करून जात होत्या. परंतु या कोण दोन स्त्रिया? त्या दु:खा आहेत. तोंडावर करूणा, लज्जा, दु:ख यांचे शतभाव. बापूंना प्रणाम करून त्या म्हणाल्या;

‘आम्ही नीच जातीत जन्मलेल्या. पशुपक्ष्यांहूनही आम्हांला हीन समजण्यात येतं. आजपासून खादी वापरण्याचं व्रत आम्ही घेत आहोत.’

गांधीजी गंभीर वाणीने आश्वासन देत म्हणाले; ‘जन्मत:च कोणी पापी नसतो. तुम्ही सूत काता. प्रामाणिक श्रम करून पोटगी मिळवा. सदाचारी राहा. म्हणजे तुम्ही मनुष्योत्तम व्हाल.’

बापूंची वाणी सद्गदित होती. त्या दोन बहिणींची मुखकमले आशेने फुलली. जणू नवजीवन मिळाले; नवजीवन सुरू झाले!

 

पुढे जाण्यासाठी .......

बापूजींच्या गोड गोष्टी