गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

बापूजींच्या गोड गोष्टीपुष्कळांना वाटते की गांधीजी रूक्ष मनुष्य होते. त्यांना जीवनात कला नको होती, गंमत नको होती, अशी पुष्कळांची समजूत आहे. परंतु ती साफ चुकीची आहे. काठेवाडात डसो म्हणून लहानसे संस्थान आहे. दरबार गोपाळदास त्या संस्थानचे मालक. गांधीजी आफ्रिकेतून आल्यावर, त्यांच्या शिकवणुकीचा परिणाम दरबार गोपाळदासांवर फार झाला. त्यांनी आपले छोटेसे संस्थान आदर्श करण्याचे ठरवले. गावात साक्षरता सुरू झाली. प्रत्येकजण घरासमोर सडारांगोळी घालून ठेवी. गावात जनतेचे न्यायमंदिर सुरू झाले. तेथे संस्थानिकांवरही खटला चालविता येत असे. गावात निरनिराळ्या कलांनाही उत्तेजन देण्यात आले. सामुदायिक नृत्ये-गर्भे असे उत्सव होऊ लागले.

एकंदरीत डसो गोकुळासारखे गजबजू लागले. एकदा दरबार गोपाळदासांच्या मनात आले की आपली ग्रामीण नृत्यकला शहरवासीयांस दाखवावी. त्यांनी अहमदाबादला जाण्याचे ठरविले. डसोची ग्रामीण कलावान मंडळी बरोबर घेऊन दरबार गोपाळदास अहमदाबादला आले. अहमदाबाद शहरात ग्रामीण नृत्यांचे, टिप-यांचे अतिसुंदर कार्यक्रम झाले.

प्रयोगानंतर दरबार गोपाळदास साबरमती आश्रमात गांधीजींना भेटावयास गेले. ‘बापू, ग्रामीण नृत्यकलेचे खेळ शहरवासीयांनाही अत्यंत आवडले, बरं का’, ते म्हणाले.

‘परंतु ते तुम्ही आधी शहरात दाखवले. माझ्या आश्रमात नाही दाखवले!’ बापू म्हमाले.

‘तुमच्या आश्रमात दाखवू?’

‘विचारता काय? खेड्यांतील निष्पाप कलांचा मी भोक्ता आहे.’

दुसरे दिवशी आश्रमात त्या ग्रामीण कलावंतांनी महात्माजींसमोर अत्यंत सुंदर कार्यक्रम केला. कार्यक्रम चालू होता. महात्माजी दरबार गोपाळदासांना म्हणाले : ‘डसोचा राजा आपल्या गावी या खेळात भाग घेत असतो, हे मला माहीत आहे. मग इथं तो का भाग घेत नाही? गोपालकृष्ण गोपालांबरोबर खेळायला का लाजेल?’ त्याबरोबर दरबार गोपाळदासही उठले. त्या ग्रामीण कलावंतांत ते सामील झाले नाचता नाचता त्यांचे देहभान हरपले. त्यांना अपार आनंद झाला. गांधीजी खूष झाले.

दुसरे दिवशी आश्रमात त्या सर्व कलावंतांना गांधीजींनी मोठ्या प्रेमाने जेवण दिले, आणि स्वत: त्यांचे वाढपी बनले.

असे बापू होते.

ग्रामीण जीवनात आनंद ओतणा-या अकृत्रिम व निष्पाप कला बापूजींस अत्यंत प्रिय होत्या.

 

पुढे जाण्यासाठी .......

बापूजींच्या गोड गोष्टी