बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

देशबंधू दास

तेलीरबाग

अशा या इतिहासप्रसिध्द परगण्यात तेलीरबाग म्हणून एक गाव अहे. चित्तरंचन दास (देशबंधू दास) यांचे पूर्वज या गावात राहत होते. देशबंधूंचे पणजोबा रतनकृष्ण दास हे अति उदार म्हणून प्रसिध्द होते. औदार्याचा गुण हा जणू वंशपरंपरागत आला आहे.

आजोबांच्या गोष्टी
देशबंधूंचे आजोबा जगबंधू. खरोखरच ते जगाचे बंधू होते. ते राजशाही येथे सरकारी वकील होते. त्यांनी पुष्कळ पैसा मिळविला. परंतु दोन्ही हातांनी तो खर्च केला. दरिद्री आप्त, शेजारीपाजारी, सर्वांना ते देत. ते नाही कधी म्हणत नसत. त्यांच्या औदार्याची कीर्ती सर्व विक्रमपूर परगण्यात पसरली होती. त्यांनी आपल्या जन्मग्रामी एक अतिथीशाळा चालविली होती. कोणाही पांथस्थाची तेथे राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था होत असे. तेथील नोकरचाकर नीट वागतात की नाही हे पाहण्यासाठी एके दिवशी जगबंधू नावेत बसून निघाले. ते आपल्या गावी येऊन पोचले तो मध्यरात्र होत आली होती. सर्वांची निजण्याची वेळ. थकलेले नोकरचाकर आरामाच्या तयारीत होते तो जगबंधू आले.

''एका अतिथीला जागा देता का? उपाशी आहे. जेवणाची सोय करता का?'' त्यांनी विचारले.

''अशा मध्यरात्री यायला काही वाटत नाही? सकाळी ये जा.'' तेथील नोकर म्हणाला.

जगबंधू रागावले. त्यांनी आपले खरे स्वरूप प्रकट केले. नोकर घाबरले, पाया पडू लागले. क्षमामूर्ति जगतबंधू म्हणाले, ''असे करीत जाऊ नका. कोणी केव्हाही येवो. त्याचे स्वागत करा. तो देवच आला आहे असे समजा.''

आणि एकदा जगबंधू पालखीत बसून कोणत्यातरी गावी जात होते. वाटेत एक वृध्द ब्राह्मण त्यांनी पाहिला. तो अनवाणी होता. मोठया कष्टाने जात होता. जगबंधूही वृध्द झाले होते, अशक्त होते. परंतु त्या ब्राह्मणाचे कष्ट त्यांना पाहवेनात. त्यांचे हृदय विरघळले. पालखीतून ते खाली उतरले. त्या ब्राह्मणाला त्यांनी पालखीत बसविले आणि स्वतः तीन-चार मैल पायी चालत गेले.

आणि जगबंधू कवीही होते. धार्मिक विषयांवर ते कविता लिहित. त्यांची सत्यनारायणाची कथा अद्याप घरोघर वाचली जाते. ते रसिक होते व रसिकांचे आश्रयदाते होते. अनेक साहित्यिकांना ते साहाय्य करीत.

 

पुढे जाण्यासाठी .......

देशबंधू दास