सोमवार, मे 17, 2021
   
Text Size

देशबंधू दास

अपूर्व प्रेतयात्रा

आणि पवित्र देह कलकत्त्यात आला. लाखो लोकांची गर्दी होती. देशबंधूंच्या बंधूंनी भजनी मेळे बोलावले होते. 'हरि बोल हरि बोल' हे भजन गगनास जाऊन भिडले. आणि महात्माजी कलकत्त्यास येऊन पोचले. शवाला त्यांनी खांदा दिला. कलकत्त्यास सकाळी ७.३० वाजता मिरवणूक सुरू झाली. ती स्मशनात पोचायला ३.३० वाजले. स्मशानघाटावर माणसे मावत नव्हती. जनतासागर उसळला होता. लोक पुढे मागे लाटांप्रमाणे हेलावत होते. आणि त्या पवित्र देहाला अग्निसंस्कार देण्यात आला. ज्वाळा दिसताच लोकांचा धीर सुटला. महात्माजींना खांद्यावर घेऊन उंच करण्यात आले. ते लोकांना म्हणाले, ''काम संपले. आता घरोघर जा.'' आणि खांद्यावरूनच महात्माजी निघाले. माझ्या पाठोपाठ या, चला, असे महात्माजी शब्दांनी व खुणांनी सांगत होते. त्याचा परिणाम झाला. हजारो लोक माघारी वळले. महात्माजींनी लिहिले, 'मी जर क्षणभर उशीर केला असता तर शेकडो लोकांनी त्या चितेत उडया घेतल्या असत्या.'

मूर्तिमंत यज्ञ

देशबंधूंची निधनवार्ता वाचून सारे राष्ट्र शोकसागरात बुडाले. अनेकांनी गुणवर्णनपर लेख लिहिले. सर्वत्र शोकसभा झाल्या. परंतु या भव्य-दिव्य जीवनाचे शब्दांनी थोडेच वर्णन करता येणार? कवीसम्राट रवींद्रनाथ म्हणाले, 'देशबंधू मूर्तिमंत यज्ञ होते.'

सेवा दलातील माझ्या मित्रांनो, हा महान आदर्श डोळयांसमोर ठेवा. किती त्याग, कशी धीरोदात्तता; किती औदार्य; किती प्रेमळपणा; कसा निश्चय, कशी इच्छाशक्ति; किती कष्ट करीत, कसे दुसर्‍या साठी धावून येत! अशी देशभक्ति कोठे पाहावी, कोठे शोधावी? तुम्ही असे ध्येयवादी बनण्याची खटपट करा. देशाचे स्मरण ठेवा. सर्वांचे ऐक्य करा. आणि स्वातंत्र्य मिळवून सर्व बंधूंचे संसार सुखाचे करण्यासाठी झटा.

 

पुढे जाण्यासाठी .......

देशबंधू दास