बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

क्रांतीची ज्वाला भडकली

कामगारांत खूप अशांतता होती. मालकांनी एकदम पगार कमी केले. तिकडे शेतकरी प्रक्षुब्ध होत होते. दुष्काळ पडला होता; परंतु दुष्काळातही सावकारांनी चालविलेल्या जप्त्यांचा सुकाळ सुरू होता. जिकडे तिकडे भुकेचे भूत स्वैर संचारू लागले. जगातील श्रमणार्‍या किसान कामगारांची भूक शांत होईल तेव्हाच जगात शांती येईल.

दिलीपचे तरुण मंडळ एकत्र जमले. ते मित्र सर्व परिस्थितीचा विचार करीत होते.

'उठाव करावा, झेंडा उभारावा.' एक म्हणाला.
'परंतु ते शक्य आहे का? पाऊल टाकणं सोपं. पुढं निस्तरणं कठीण.'

'शक्याशक्यतेच्या चर्चा करू तर कधीच काही हातून होणार नाही.'

'आणि अपयश आलं तर?'

'जगात एकदम यश कोणाला मिळालं आहे? आपल्या अपयशातून भावी यश फुलेल. अशा अनुभवातूनच जग पुढं जात असतं. अनेक अपेशी प्रयत्‍नांतून एक दिवस यश उभं राहातं. शेकडो वेदनांतून, अपयशांतून समाजाची नवीन घडी निर्माण होते; नवीन क्रांती जन्मते. आपल्या त्यागातून व बलिदानातून उद्याच्या यशस्वी क्रांतीचा पाया घातला जाईल. आपण आज बी पेरू, उद्याच्या पिढीला कणीस मिळेल.'

'आपल्याजवळ साधनसामुग्रीही नीटशी नाही.'

'मोडकीतोडकी आहे ती पुरे. कामगारांनी इकडून तिकडून गोळा केली आहे. भूत बंगल्याची गढी करू व लढवू.'

 

पुढे जाण्यासाठी .......