शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

क्रांतीची ज्वाला भडकली

दिलीप रात्री आपल्या मित्रांबरोबर त्या माहीमच्या वाडयात गेला. उजाडत बंडाचा झेंडा, क्रांतीचा झेंडा त्या वाडयावर फडकवणार होता. वाडयात क्रांतीचे सैनिक जमले होते. त्यांनी मोडक्यातोडक्या बंदुका दुरुस्त केल्या. चोरून आणलेला दारूगोळा तेथे होता. तेथे एक मोडकी तोफ होती. ती त्यांनी उभी केली.

आज शहरात लष्करी कायदा आहे. कोणी घराबाहेर पडायचे नाही. हुकूम आहे. ती पाहा सरकारी पलटण! त्या पाहा तोफा, ते घोडेस्वार! माहीमच्या रस्त्याला चालले लष्कर.

क्रांतिकारकांच्या वाडयापासून काही अंतरावर सरकारी तोफा उभ्या राहिल्या. सूर्य वर आला. वाडयावर क्रांतीचे निशाण झळकले. सूर्याने सोनेरी किरणांनी त्या झेंडयाला आलिंगन दिले. वार्‍याने गाणे म्हटले. त्या वाडयातून क्रांतिगीतांच्या घोषणा सुरू झाल्या. समोरच्या सरकारी तोफेतून गोळा सुटला. धुडूम धुडूऽम - आवाज झाला. वाडे हादरले, तावदाने खळकन् पडली. भिंतीवरची घडयाळे पडली. धुडूम धुडूऽम. तो पाहा एक गोळा झेंडयाला चाटून गेला. झेंडा पडू नये म्हणून तो पाहा एक वीर तेथे उभा राहिला. आला, गोळा आला! त्या वीराच्या चिंधडया झाल्या. झेंडयाची या लाल तुकडयांनी पूजा झाली. हुतात्म्याच्या रक्ताने झेंडा रंगू लागला आणि तो पाहा एक युवक! बारा-चौदा वर्षांचा असेल. सरकारची फौज व क्रांतिकारकांचा वाडा यांच्यामध्ये तो रस्त्यात उभा आहे. आगीच्या वर्षावात उभा आहे. सरकारी तोफांतून येणारे काही गोळे जमिनीवर पडत. जे फुटत नसत ते तो युवक उचली. टोपलीत भरून क्रांतिकारकांना नेऊन देई. शाबास त्याची. मध्येच तो आपली टोपी उडवी व क्रांतीचा जयजयकार करी. वाडयातील क्रांतिकारक ब्युगुले वाजवीत. परंतु - अरे, तो पाहा लाल गोळा आला. त्या कोवळया मुलाचे तुकडे झाले. ते दशदिशांत उडाले. मरताना क्रांती म्हणून तो ओरडला. अणुरेणूतून तो आवाज घुमला. वाडयावर गोळे पडत होते. वाडयाचा काही भाग पडला. काही लोक उघडे पडले. बंदुकींच्या फैरी झडू लागल्या. ती पाहा एक गोळी सूंऽ करीत आली. दिलीपला लागणार, लागणार. हे काय? कोणी तरी त्याला एकदम दूर लोटले व ती गोळी स्वत:च्या छातीवर घेतली. ती व्यक्ती पडली. दिलीप तिच्याजवळ गेला. कोण होती ती व्यक्ती?

 

पुढे जाण्यासाठी .......