गुरुवार, ऑक्टोबंर 01, 2020
   
Text Size

प्राचीन ऋषिवर

अशा रीतीने जीवनात अद्वैत आण, असे ते सांगू लागले. सर्वांचा संसार सुखाचा करा. रुद्रसूक्ताकार तर म्हणतोः “अंथरुण द्या. पांघरुण द्या. दूध, तूप, मध द्या; बुद्धी द्या, धैर्य द्या, विनय द्या, वैभव द्या. सर्व समाजाला अंतर्बाह्य सुसंस्कृत करा, विकसित करा.” असे तो म्हणतो. “-हीश्च मे श्रीश्च मे” नुसते वैभव किंवा नम्रता नको. वैभवाबरोबर नम्रता आणि नम्रतेबरोबर वैभव. नाहीतर काहींची नुसती खाली मान. आणि काहींची मान तिरशिंगरावांसारखी. दोन्ही त्याजच. समाजात केवळ दीन नि केवळ घमेंडनंदन कोणी नकोत. अशी ही थोर दृष्टी आहे.

वैभवाचा खरा मार्ग
आणि वैभवसुद्धा सुपथाने जाऊन मिळणारे असू दे. अग्नीजवळ धनदौलत, वैभव मागितले. परंतु “चांगल्या मार्गाने वैभवाकडे ने,” असेच म्हटले आहे.

समाजात खरे अद्वैत राहिले, सर्वांचा विकास झाला तर केवढा आनंद उचंबळेल ! विविध क्षेत्रात आपण कामे करीत असलो तरी ती ती कामे सर्वांच्या सुखासाठी आहेत, ही भावना मनात असली म्हणजे झाले. म्हणून वेदाच्या शेवटी- “समानीय आकृतीः समाना हृदयानिवः- तुमचे विचार एक असोत,” तुमची हृदये एक असोत- असे म्हटले आहे. तुम्ही वस्त्र निर्माण करीत असाल; म्हणा हे सर्वांसाठी. असा सर्वांच्या कल्याणाचा विचार सर्व उद्योगांच्या मुळाशी असू दे. ती भावना हृदयात जीवंत असू दे. म्हणजे मग आनंदाला काय तोटा ?


 

पुढे जाण्यासाठी .......