गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

ध्रुव बाळ

लहान मुलांनी परमेश्र्वर जितक्या सुलभतेने मिळवला तसा दुस-या कोणाला मिळवता आला नाही. इतरांना किती कष्ट, किती यातायात; किती घोर तपश्र्चर्या नि योगसाधना, परंतु लहान बालकांनी एका झेपेत प्रभूला पकडले. लहान मुलांचा स्वभाव निर्मळ असतो. त्यांचा निर्धारही अचल असतो. त्यांनी एकदा मनात घेतले की घेतले. त्यांची एकाग्रताही पटकन होते. किती स्थिर दृष्टीने एखाद्या वस्तूकडे ती पाहात राहतात. खेळात रमली तर तहानभूक विसरतात. हिंदुस्थानचा इतिहास लहान मुलांनी जणू बनवला आहे. ध्रुव बाळापासून तो हुतात्मा शिरीषपर्यंत लहान बाळांची महान् परंपरा आहे. या तेजस्वी परंपरेचे ध्रुव नि प्रल्हाद प्रस्थापक आहेत.

प्राचीन भारतातील किती तेजस्वी, पुण्यप्रतापी मुले माझ्या डोळ्यांसमोर येतात, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र. तो उपमन्यु, तो सत्यकाम, नि तो मृत्युदेवाजवळही अध्यात्म-विद्येचे धडे घेणारा बाळ नचिकेत; पित्याला शिकवणारा अष्टावक्र; मरायला आनंदाने तयार होणारा चिमणा चिलया, आणि मायबापांबरोबर सारी सुखे सोडून उपाशीतापाशी जाणारा तो रोहिदास ; किती तरी तेजस्वी बाळे. परंतु ध्रुव नि प्रल्हाद यांचे तेज औरच आहे.

ध्रुवतारा, ता-यांभोवतालचे काव्य
तो आकाशातील ध्रुवतारा आपण ध्रुवाचा मानतो. तो आकाशातील तारा सर्व जगाला मार्गदर्शन करीत आला आहे. भारतीय ध्रुव आकाशात बसून सा-या विश्चाचा झाला आहे. प्राचीन भारतीय दंतकथा आकाशातील ता-यांच्या महाकाव्याशी एकरुप झालेल्या आहेत. त्या अतिप्राचीन पूर्वजांना हिंदुस्थानात आल्यावर स्वच्छ अशा खात्रीच्या निरभ्र आकाशातील अनंत तारे दिसत. त्यांचे मन उचंबळे. ते सारखे पाहात राहिले असतील. आकाशातील ता-यांभोवती रमणीय दंतकथा पूर्वजांनी निर्माण केल्या. त्यांनी ते श्रवण नक्षत्र पाहिले. कावडीसारखे दिसणारे. त्यांना वाटले, काय बरे हे आहे ? आणि श्रावणाची करुण कथा जन्मली. अंध आईबापांना मुलगा कावडीत घालून हिंडवी. श्रावण त्या मुलाचे नाव. किती सहृदय कल्पना आणि दशरथाच्या हातून त्या मुलाचा-पितृनिष्ठ बाळाचा-चुकून मृगया करताना वध झाला. मायबाप पुत्रशोकाने मेले आणि दशरथाला त्यांनी शाप दिला. तूही पुत्रशोकाने मरशील. राजाला त्या शापातही जणू आशा मिळाली. पुत्र नसेल तर पुत्रशोक कोठला ? तेव्हा पुत्र होणार, ही आशा निर्माण झाली. सा-या रामायणाचा धागा येथे सापडतो, परंतु श्रावणाची कथा, रामायणाचे हे सूत्र आकाशातील तीन ता-यांच्या श्रवणनक्षत्राभोवती सारे गुंफलेले आहे. आणि व्याध व मृग नक्षत्र यांची कथा- व्याध हा तेजस्वी तारा. आणि मृग नक्षत्राची ती हरणाकार आकृती आणि तेजस्वी ता-यांचा तो बाण. हे सारे पाहून मृग- व्याधीची रमणीय दंतकथा पूर्वजांनी निर्मिली. एक व्याध होता. त्याने मृगाला पकडले. मृग म्हणालाः “मला मुलाबाळांना, मायबापांना, पत्नीला भेटून येऊ दे.”

 

पुढे जाण्यासाठी .......