गुरुवार, जानेवारी 23, 2020
   
Text Size

ध्रुव बाळ

निराश होऊन सेवक, दूत परतले. स्वतः राजा मग निघाला. कवींनी हा प्रसंग किती सुरेख रंगवला आहे. अपमान करणारा पिता बाळाची समजूत घालीत असतोः

“फिर मागे देईन एक गाव
ध्रुव बोले देईल देव-राव”

असा संवाद चालला. आता बापाजवळचे क्षणभंगुर वैभव कशाला ? तो प्रभुवराजवळ शाश्वत वैभव मागायला जात असतो. सामान्य बालक तेव्हाच भुलले असते. एक गाव, दहा गावे, अर्धे राज्य, सारे राज्य...राजा देऊ लागतो. परंतु ध्रुव विचलित होत नाही. मोहात पडत नाही. वडी पाहून, खाऊ पाहून, खेळणे पाहून मूल भुलते. परंतु हे मूल निराळ्या तेजाचे होते. बाप हिरमुसला होऊन माघारी वळतो; आणि तेजस्वी ध्रुव बाळ पुढे जातो.

नारदऋषींची भेट
वाटेत नारद भेटतात. तेही त्याला घरी जा, म्हणून सांगतात. “तू लहान. घोर अरण्य लागेल. वन्य श्वापदे अंगावर येतील. साप फुत्कारत येतील. नको जाऊ बाळ. चल मी तुला घरी नेतो. तुझ्या पित्याची समजूत घालतो. अरे तुझी मुंजही झालेली नाही. ज्ञानाचा काय तुला अधिकार ? थोरमोठ्यांना देव मिळत नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करतात, परंतु प्रभुप्राप्ती होत नाही. तुला मुलाला कुठून देव मिळायला ? चल माघारा ; हट्ट नको करु.”

“आता मरेन ; परंतु माघारी येणार नाही. देव मला भेटेल. आई म्हणाली, लहान मुलाची हाक तो ऐकेल. आई का खोट बोलेल ? मला जाऊ दे. मला कशाचीही भीती नाही. लहान मुलाला कोणी खाणार नाही. तुम्ही जा. मला जाऊ दे.”

“बाळ, त्याला तू कोणत्या नावानं हाक मारणार ?”

“मी देवा देवा म्हणेन, प्रभू प्रभू म्हणेन-”

“तू ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र म्हण. या मंत्राचा अहोरात्र जप कर. प्रभुमूर्ती अंतःकरणात स्थापन कर. चार हाताचा तो देव, शंखचक्र, गदा, पद्मधारी, पीतांबर नेसलेला, वैजयंती माळा गळ्यात असलेला असा तो नारायण- त्याची मूर्ती हृदयात बघत जा. देव भेटेल. जा, तुला यश येवो.”

 

पुढे जाण्यासाठी .......