शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

ध्रुव बाळ

कृतार्थ  बाळ परत येत होता. राजाच्या कानांवर वार्ता आली. सारी प्रजा दर्शनार्थ लोटली. चतुरंग सैन्यानिशी राजा सामोरा गेला. आनंदाला सीमा नव्हती. पित्याने बाळाला हृदयाशी धरले. सुरुचीनेही धन्यवाद दिले, आणि तो आपल्या मातेला भेटला. त्या प्रसंगाला कोण वर्णील ? राजाने ध्रुवाला राज्याभिषेक केला. राजा तपासाठी निघून गेला. ध्रुवाने न्यायाने राज्य चालवले, मेल्यावर तो अढळपदी बसला.


ध्रुव ध्रुवची तो खरा
प्राचीन काळापासून ही ध्रुवकथा सर्वांना स्फूर्ती देत आली आहे. आणि भारतवर्ष आहे, तोवर ती स्फूर्ती देत राहील. ध्रुव म्हणजे विश्वाचा महामेरू. ध्रुव म्हणजे क्षुद्र गोष्टींना न भुलणे, क्षणभंगुराला न कवटाळणे. ध्रुव म्हणजे निर्भयता, ध्रुव म्हणजे विश्वास. ध्रुव म्हणजे अपार श्रद्धा, अनंत साधना. ध्रुवकथा सांगत आहे की एकदा ध्येय निश्चित केलेत म्हणजे त्याच्या पाठोपाठ जा. मग दुसरी गती नाही. दुसरा उद्योग नाही.

ध्रुवाने अपमान सहन केला नाही. अपमान सहन करणे म्हणजे आत्महत्याच ती. अपमान गिळल्यावर शिल्लक काय राहणार ? अर्थात ध्रुव सदाभिमानाचा भोक्ता होता. अहंकारी नव्हता. आई सावत्र असली तरी पिता सावत्र नव्हता. पित्याला सारी बाळे समानच. परंतु पिताही सावत्रपणा दाखवतो, हे त्या तेजस्वी बाळाला सहन झाले नाही.

माझे एक मित्र आहेत. त्यांचे वडील त्यांना न्याय्य हिस्सा देत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीत पित्याने वाटणी केली. एका मुलाला अधिक दिले, एकाला कमी. माझा मित्र ध्येयार्थी; तो देऊन टाकील सारे, असे का पित्याला वाटते ? माझ्या मित्राने मला ही गोष्ट सांगितली. मी म्हटले,  “कशाला झगडता ? आपण स्वातंत्र्याच्या लढाईत सर्वस्व त्यागानं पडलो. मग जमिनीची काय कथा ?” ते मला म्हणाले, “मला जमिनीची आसक्ती नाही. परंतु हा अपमान वाटतो. आम्ही दोघे सख्खे भाऊ. असं असताना हा अन्याय का ? मला हा अन्याय सहन होत नाही.”

मला ध्रुवाची गोष्ट आठवली. ध्रुव अपमान सहन करु नको सांगतो. परंतु अपमान सहन न करणे म्हणजे काय कोर्टकचे-या करणे ? ध्रुवाने बापाचे काहीच नको म्हटले. अन्यायी पित्याचे मला काहीच नको. आणि तो स्वतः उभा राहीला. “देवा, सांगू दुःख ?”  इतरेजनांजवळ रडकथा सांगत न बसता, हृदयात सत्यानारायणाला स्थापून तो प्रयत्नदेव झाला. ध्रुव या शब्दाचाच आता ‘प्रखर निश्चयी’ असा अर्थ झाला आहे. ध्रुव म्हणजे शाश्वत टिकणारे. ध्रुवासारखा करारी नि निर्धारी ध्रुवच. म्हणून कवी मोरोपंत म्हणतातः


 

पुढे जाण्यासाठी .......