गुरुवार, जुलै 09, 2020
   
Text Size

प्रल्हाद

पित्यासमोर
पित्याच्या कानांवर गोष्टी गेल्या. त्यांनी गुरुजींस बोलावून सारे विचारले. गुरुजी थरथरत होते. ते म्हणाले, “मी काय करु ? तुमचा मुलगा ऐकत नाही. तो मलाच उलट शिकवतो. म्हणतो, “तुम्ही चुकीचं शिकवता. सारं शिक्षण म्हणजे परमेश्वराला भजणं, त्याला स्तवणं.” मी त्याला शतवार सागितलं की हिरण्यकशिपू सर्वांत मोठे. तो संतापून म्हणाला, ‘तो भगवान् वासुदेव मोठा, तुम्ही मला खोटं शिकवता ?’ काय करायचं तुमच्या मुलाला ? तो इतर मुलांनाही फूस देतो. तोच जणू शाळा चालवतो. मुलं त्याच्याभोवती.”

पिता खवळला. त्याने पुत्राला बोलावणे पाठवले. प्रल्हाद आईजवळ होता. ती त्याला सांगत होती ; “बाळ, पित्याचं ऐक. ते रागावतील. मारतील. त्यांचा शब्द मोडू नकोस.”

प्रल्हाद म्हणाला, “आई, मी का सत्य सोडू ? सत्याहून थोर काय आहे ? सत्यासाठी जगावं. वडील पूज्य, परंतु ते का देवाधिदेव ? शेवटी सर्वांना मरायचंच आहे.”

आई म्हणाली, “तुझा पिता अमर आहे. त्यांनी तसे वर मिळवले आहेत. घोर तपश्चर्या करुन त्यांनी अमरता संपादिली आहे. ते सर्वांना अजिंक्य आहेत.”

प्रल्हाद म्हणाला, “अमरतेचा वर देवाजवळूनच त्यांनी मिळवला ना ? म्हणजे शेवटी कोण ? कुणाचा त्यांनी जप केला ? वरांची कोणाजवळ भिक्षा ? आपण मर्त्य जीव. सर्वश्रेष्ठ तो परमात्मा. त्याला भजावं; त्याला नमावं. खोटा अहंकार काय कामाचा ? सत्य ते सत्य.”
आई म्हणाली, “तुझा पिता महाबळी आहे. सारी संपत्ती त्याच्यापाशी आहे.”

प्रल्हाद म्हणाला, “बळीचा बळी तो वासुदेव. त्याच्या पदरजावरुन सारी संपत्ती ओवाळून टाकावी.”

“बाळ, तू नाही ना ऐकत ? ते तुला छळतील. त्यांना दया-माया नाही.”

“आई, तू निश्चिंत अस. तो प्रभू माता, अनाथाचा रक्षणकर्ता.”

 

पुढे जाण्यासाठी .......