गुरुवार, फ़ेब्रुवारी 25, 2021
   
Text Size

मधुरीची भेट

माधव जे पेय प्यायला, त्याचा एक विशेष परिणाम होत असे. ते पेय प्यायल्यावर जी स्त्री प्रथम दिसेल तिच्यावर प्रेम जडायचे असे होत असे. माधव व सैतान जात होते. माधवाच्या मनात आज निराळयाच भावना उचंबळत होत्या. तो आज नवीन झाला होता.

ती पाहा एक मुलगी देवळात जात आहे. हातात पूजेचे ताट आहे. तिच्या अंगावर अलंकार नाहीत. साधे पातळ आहे. गरिबाची आहे वाटते ती?

माधवाने तिला पाहिले, त्याचे तिच्यावर प्रेम बसले. तो वेडा झाला. तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. ती मुलगी बावरली, घाबरली. ती लगबगीने जाऊ लागली. माधव तिच्या पाठीशी होताच. हातातील पूजेच ताट खाली पडले. माधव एकदम लघळपणे खाली वाकला. त्याने ते ताट उचलून तिच्या हातांत दिले. ती लाजली. रागावली.

‘लाज नाही वाटत पाठोपाठ यायला? माणसे का कुत्री तुम्ही? हा काय चावटपणा? खबरदार पाठोपाठ याल तर. मनाची नाही तर
निदान जनाची तरी. चहाटळ कुठला. मला नसते ताट उचलता आले? तुझ्यामुळे तर ते पडले.’ असे ती संतापाने म्हणाली.

माधव थबकला. मुलगी निघून गेली. परंतु तिने मागे वळून पाहिले. तो पाठोपाठ येत आहे की काय हे का तिने पाहिले? ते पाहाणे प्रश्नार्थक होते की, इच्छार्थक होते? काय होता त्या पाहाण्याचा अर्थ?

‘सैताना, ही मुलगी मला मिळाली पाहिजे. तिच्याशिवाय मी जगणार नाही. तिच्याशिवाय मला चैन पडणार नाही. कोणतीही युक्ती कर. वाटेल ते कारस्थान कर, परंतु मी मला हवी.’ माधव म्हणाला.

‘घाबरु नकोस. तुझ्या इच्छा पुरविणारा मी परमेश्वर आहे. चल माझ्याबरोबर. तिकडे आपण गंमत करू.’ सैतानाने सांगितले.
दोघे चालू लागले. थोडया वेळाने एका लहानशा घराजवळ सैतान थांबला.

‘का थांबलाससा?’ माधवने विचारले.

‘हे तिचे घर.’ सैतान हसून म्हणाला.

‘मग?

‘हा मोत्यांचा कंठा हया खिडीकीतून आत फेक.’ सैतानाने सांगितले. तो एक सुंदर हार होता. करवंदाएवढी मोती होती. सैतानाने तो माधवाच्या हातात दिला. माधवाने खिडकीतून तो आत फेकला.

‘पुढे काय?’ त्याने विचारले.

‘येथेच जरा थांबू. काय होते ते पाहू.’ सैतान म्हणाला.

दोघे बाजूला उभे राहिले. काही वेळाने ती मुलगी आली. ती घरात गेली. ती आपल्या खोलीत शिरली. तो तेथे तो मोत्यांचा हार. त्या हाराकडे ती बघत राहीली. कशी टपोरी मोती, किती पाणीदार! तिने हळूच तो हार उचलला. तिने तो आपल्या गळयात घातला. तिने आरशात पाहिले. तिच्या गोर्‍या गोर्‍या गळयात तो खुलून दिसत होता; परंतु कोठून आला तो हार? आईला सांगितले पाहिजे.

तिकडे त्या मुलीची आई काम करीत होती.

 

पुढे जाण्यासाठी .......