मंगळवार, एप्रिल 20, 2021
   
Text Size

पुन्हा घरी

माधवाच्या घरी म्हातारा भय्या होता. तो आपल्या धन्याची रोज वाट बघत असे. तो दिवाणखाना झाडून ठेवी, अंगण झाडून ठेवी. रोजच्याप्रमाणे भय्या उठला व अंगण झाडायला गेला. तो अंगणात कोण निजले होते? तो तर धनी. माधव तेथे पडला होता. त्याला झोप लागली होती. भय्याला वाईट वाटले. धनीसाहेब का रात्री आले? त्यांनी हाका मारल्या असतील? मला जाग नाही आली. अशी कशी झोप लागली मला. ते खाली जमिनीवर निजले. पांघरायला नाही, अंथरायला नाही, अरेरे. त्या भय्याला फार वाईट वाटले. त्याने धन्याला हलके हलके हाका मारल्या माधवने डोळे उघडले.

‘धनीसाहेब!’

‘कोठे आहे मी?’

‘आपल्या घरी. तुम्ही रात्री आलेत वाटत? मला हाका नाही मारल्यात? उठा. गारठला असाल. दिवाणखाना स्वच्छ झालेला आहे. पलंगावर स्वच्छ गादी आहे. उठा!’

भय्याने हात धरून मालकाला वर नेले. गादीवर निजविले. माधव झोपी गेला. जणू कित्येक वर्षे तो झोपला नव्हता. बर्‍याच वेळाने तो उठला. त्याने स्नान वगैरे केले. तो जेवला. नंतर पुन्हा झोपला. तिसरे प्रहरी तो उठला. गच्चीत अरामखुर्चीत तो पडला होता. समोर समुद्र उचंबळत होता. तो पाहु लागला. तो विचार करू लागला. आपल्या गावाला समुद्र आहे; परंतु दलदलीही आहेत. कोण बुजवणार हया दलदली? मी बुजवीन. माझी सारी संपत्ती त्यांत खर्च करीन. आता नकोत पुस्तके, नकोत नाना विद्या. आजपर्यत त्यांत पैसा खर्च केला. आता दलदली दूर करण्यात खर्चू. दलदली गेल्या तर डास मरतील. हिवताप हटेल. रोग जातील. दलदली आहेत तेथे बागा फुलतील. तेथे लोक फिरायला जातील. मुले बाळे खेळतील. गावात आरोग्य वाढेल, आनंद वाढेल, सौंदर्य वाढेल. सर्वाना सुखी करणे, हयात किती सुख आहे ! सर्वांच्या तोंडावर तेज, प्रसन्नता, आनंद समाधान फुलवण्याची खटपट करणे, किती थोर आहे ते काम? इतक्या वर्षात असा सुंदर विचार माझ्या मनात का बरे आला नाही?

अशा विचारांत माधव रंगला होता. इतक्यात दिवाणखान्याच्या दारावर कोणी टकटक केले.

‘कोण आहे?’

‘आम्ही तिघी बहिणी,’

‘एकेक आत या.’

एक बहीण आत आली. तिचे तोंड दु:खी होते. डोळे भरलेले होते.

‘काय आपले नाव?’ माधवने प्रश्न केला.

‘दु:खदेवता.’ ती म्हणाली.

‘का आलात?

‘एक प्रश्न विचारायचा आहे.’

‘विचारा.’

‘माझी सत्ता तुम्ही मान्य करता की नाही?’

 

पुढे जाण्यासाठी .......