बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

विश्राम

एके दिवशी सगुणा विश्रामला म्हणाली, “अलीकडे माझे कपाळ फार दुखते. दिवसभर दळणकांडण करत्ये, परंतु कसे करत्ये ते माझे मलाच ठाऊक!  आज फार वेदना होत आहेत-सारखा ठणका लागला आहे. काय करावे?”

विश्राम म्हणाला, “पित्त झाले आहे. परंतु आपणाला कोठे मिळणार दूध नी बीध ? कसलीशी गोळी उगालून दुधातून देतात पित्तावर. परंतु मी कोठून आणू दूध? गरिबांना देवाने कधी आजारी पाडू नये. श्रीमंतांनी दुखण्याचा मक्ता घ्यावा. संपत्ती ते घेतात, दुखणी त्यांनीच घ्यावी. औषधाला पैसे तरी त्यांच्याजवळ असतात. गरिबांना आजारी पडून कसं चालेल? उद्या तू कामाला जाऊ नकोस.”

सगुणा म्हणाली, “कामाला न जाऊन कसे चालेल? मामंजी म्हातारे झाले तरी कामाला जातात. मी तरणीताठी पोर. मला घरात बसण्याची लाज वाटते. काम करायला नाही हो मी कंटाळले! हातपाय धड असल्यावर काम करायला काय झाले? परंतु हे कपाळ मेले भारीच दुखते हो!”   

विश्राम म्हणाला, “कपाळाला तेल चोळीन म्हटले, तर तेल सुद्धा घरात नाही. नुसते दाबून देऊ ?”  

सगुणा म्हणाली, तुम्ही दिवसभर दमता;  तुम्हाला सांगायला धीर नाही होत.

विश्राम सगुणाचे कपाळ दाबू लागला. विश्रामच्या हाताला एक फोड आला होता. सगुणेला तो कळला. सगुणा त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, “ हे काय, केवढा फोड! काय लागले हाताला ?”

विश्राम म्हणाला, “त्या दिवशी लाकडे फोडीत होतो, तो एक लाकूड उडाले, हातावर जोराने बसले. ते अजून बरेच होत नाही. पुनःपुन्हा आत पाणी जाऊन सुजते. होईल बरे.”

सगुणा कोष्टी होऊन म्हणाली, “खरेच तुम्हाला त्यांच्याकडे फार पडते काम. मी परवा तेथे कांडण करीत होत्ये. तुम्ही ते अंगण खणीत होता. दमल्यामुळे तुम्ही जरा बसला होता, तो एकदम तुमच्या अंगावर तो मालक ओरडला. क्षणभरही तो तुम्हाला बसू देत नाही. ते सारं अंगण तुम्ही एकट्याने खणले आणि हाताला असा फोड आलेला! मालकाला दया नाही का हो येत ? कांडता कांडता मला रडू येत होते तुमचे हाल पाहून.”

 

पुढे जाण्यासाठी .......