रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

मोलकरीण

कोकण भाग म्हणजे महाराष्ट्राचा अलंकार आहे. कोकण पैशाने दरिद्री आहे, धनधान्याने गरिब आहे; परंतु सृष्टीचे अपार वैभव तेथे ओतलेले आहे. घनदाट जंगले, नारळी-पोफळीच्या बागा, गगनचुंबी वृक्षाच्छादित पर्वत, अनंताचे दर्शन घडविणा-या, पाताळगंगेची भेट करविणा-या खोल द-या, सारखी “मामनुस्मर युद्ध्य च” अशी जगाला शिकवण देणारा, कर्मयोगाची गर्जना करणारा तो अपार सागर ! या श्रीमंतीत कोकणातील गरीब जनता वाढत असते.

अशा या निसर्गसुंदर कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील राजापूर हा प्रसिद्ध गाव आहे. राजापूर हे लहानसे शहरच आहे असे म्हटले तरी चालेल. राजापूरला कधी कधी गंगा येते व लाखोंची यात्रा त्या वेळेस तेथे जमते. अशा या पुण्यवान राजापुराजवळ एक लहानसे खेडे होते. ते खेडे गरिब होते. एकही कौलारू घर त्या गावात नव्हते. सारी केंबळी घरे. गावाच्या भोवती भरगच्च आंबराई होती. आंबराईत अंबाबाईचे एक देवालय होते. जवळच एक प्रवाह वहात असे व त्याला बारा महिने तेरा काळ पाणी असे. ईश्वराची जणू ती करुणाच त्या गावासाठी सदैव वहात होती !

त्या खेडेगावात गोविंदभटजी म्हणून एक भिक्षुक होते. त्यांनी लहानपणी मधुकरी मागून वेदाध्ययन केले होते. संहितापदापर्यंत त्यांनी म्हटले होते. ते राजापुरी भटजी होते. राजापुरी भटजी होते. राजापुरी म्हटला म्हणजे एक विशिष्ट प्रकार डोळ्यांसमोर उभा राहतो. राजापुरी भटजी म्हटला म्हणजे ढोपरापर्यंत पंचा अंगात बाराबंदी, डोक्यावर भले मोठे पागोटे, खांद्यावर पडशी व अंगावर किंवा कमरेभोवती आवळलेले उपरणे अशी मूर्ती !

वेदमंत्र म्हणून दाखवावे, कोणी काय आण-अर्धा आणा देईल तो घ्यावा. कोणी तांदूळ दिले तर ते पडशीत ओतून घ्यावे, असा राजापुरी भटजींचा उद्योग असतो. पावसाळ्याचे चार महिने घरी काढून उरलेले आठ महिने फिरती करावयाची, मिळेल त्यावर चरितार्थ चालवावयाचा, अशी त्यांची अल्पसंतोषी व बहुश्रमी वृत्ती असते.

गोविंदभटजींच्या पत्नीचे नाव राधाबाई. गोविंदभटजी फिरतीवर असले म्हणजे राधाबाईंचा वेळ नेहमी देवदेव करण्यात जात असे. केळींना चार घागरी पाणी घालावे, फुलझाडांची काळजी घ्यावी, परसात स्वच्छता ठेवावी, अंगणे सारवून आरश्यासारखी करावी, हे राधाबाईंचे काम असे. उरला वेळ त्या देवाच्या सेवेत दवडीत.

त्यांच्या घरात मूल नव्हते. गोविंदभटजी व राधाबाई त्यामुळे कष्टी होत असत. मूल म्हणजे घराचे भूषण. सरोवराला कमळाने शोभा, आकाशाला चंद्राने शोभा, समुद्राला तरंगांनी शोभा, लतेला फुलांनी शोभा तशी घऱाला मुलाने शोभा. राधाबाईंना आपले जीवन निष्फळ वाटे. ‘आई’ असे म्हणवून घेण्याचे त्यांच्या नशिबी नव्हते. त्या कोणाला जवळ घेणार ? कोणाला कुशीत निजविणार ? कोणाला पायावर व्हाऊमाखू घालणार ? कोणाला कडेवर घेऊन देवदर्शनाला जाणार? त्या कोणाला मांडीवर घेणार ? कोणाला आंदुळणार ? कोणाला भरविणार ? कोणाला ओव्या म्हणणार ?

 

पुढे जाण्यासाठी .......