शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020
   
Text Size

तीन मडकी

मेजवानीचा दिवस उजाडला. गावातील मोठमोठयांस आमंत्रण देण्यात आले. जेवणाची तयारी झाली, कण्यारांगोळया घालण्यात आल्या. चंदनाचे पाट मांडले गेले. सुंदर केळीची पाने होती. जावयासाठी सुंदर असे चांदीचे ताट होते, अगरबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. 

अगदी आयत्या वेळेस भिकंभट फडक्यात मडके गुंडाळून घेऊन धनमलच्या घरी आला. त्याला खोली दाखविण्यात आली. तो त्या खोलीत गेला. भरपूर माल पाच मिनिटात त्याने दिला. बाहेर पंगत बसली. मंडळी जेवू लागली. 

धनमलने काय केले, वाढायला भरपूर पक्वाने आहेत असे पाहून ज्या खोलीत ब्राह्मण होता तिला एकदम त्याने बाहेरून कडी लावून घेतली. ब्राह्मण ओरडू लागला, मला शौचास जावयाचे आहे. मला लघवीस जावयाचे आहे, दार उघडा. असे ओरडू लागला. कोणी दार उघडीना.

धनमल येऊन म्हणाला, 'भटजीमहाराज, आता खोलीतच मरा. मडक्यातील पक्वान खा. पाणी मिळणार नाही. बाहेर पडता येणार नाही. जर खोलीतून बाहेर पडायचे असेल तर ते मडके मला दिले पाहिजे.'

काय करणार भिकंभट? मडके द्यावयास तो तयार झाला. धनमलने मडके घेऊन त्याला दार उघडले. ब्राह्मण रडत घरी गेला. इकडे जेवणे चालली होती. धनमल पंगतीत जाऊन म्हणाला, 'स्वस्थ होऊ दे भोजन. आता' आणखी दुसरी पक्वाने लवकरच येतील. 'त्या मडक्यातून तर्‍हेतर्‍हेची ताजी ताजी पक्वाने बाहेर पाडण्यात येऊ लागली. मंडळी संतुष्ट होत होती. 

इतक्यात भिकंभट ते राक्षसाचे मडके घेऊन धनमलकडे आला. ते मडके इतके दिवस माळयावर नीट ठेवण्यात आले होते. ब्राह्मण धनमलला म्हणाला, 'एक मडके घेतलेस, आता हेही घे. यातून तर अधिकच सुंदर पदार्थ बाहेर पडतात. घ्या हे. मला काही नको.'

धनमल म्हणाला, 'आण इकडे. नको तर नको. ' ब्राह्मण मडके देऊन निघून गेला. धनमल पुन्हा पंक्तित जाऊन म्हणाला, 'स्वस्थ जेवा. आता आणखी निराळेच पदार्थ येणार आहेत. हे पदार्थ कधी बाधणार नाहीत. खायला संकोच नका करू.'

धनमलने ते नवीन मडके हलवले. तो काय! त्यातून सोटे घेतलेले राक्षस बाहेर पडले. ते भयंकर राक्षस सर्वांना बदडीत सुटले. जावईबोवांच्या पाठीत चांगलाच तडाखा बसला. सासरे धनमल तर ओरडू लागले, 'मेलो मेलो' म्हणू लागले. सर्वांची त्रेधातिरपीट. पोटे फार भरलेली म्हणून न पटकन उठता येई न पळता येई. नेसूचे सावरणेही मुष्कील झाले. 

'अरे त्या ब्राह्मणाला बोलवा. त्याला बोलवा' असे धनमल सांगू लागला. कोणी तरी ब्राह्मणाला सारे जाऊन सांगितले. ब्राह्मण तेथे आला. तो धनमल यास म्हणाला, 'माझे पहिले मडके दे म्हणजे राक्षस नाहीसे करतो.' ते पहिले मडके देण्यात आले. भिकंभटाने 'शिव शिव' 'शिव शिव' असे म्हटले. तात्काळ राक्षस अदृश्य झाले. सर्वांचे जीव खाली पडले. 

भिकंभट दोन्ही मडकी घेऊन घरी आला. पुनश्च त्याच्या वाटेला कोणी गेले नाही. भिकंभट, सावित्रीबाई, त्यांची मुलेबाळे सारी सुखात राहिली.

संपली आमची कथा सरो ऐकणाराची व्यथा

 

पुढे जाण्यासाठी .......